सतर्क रहा; मार्गदर्शक व्हा
By admin | Published: September 23, 2016 01:38 AM2016-09-23T01:38:49+5:302016-09-23T01:39:15+5:30
मोर्चा बंदोबस्त बैठक : कुंभमेळ्याचा अनुभव वापरण्याचा सिंघल यांचा सल्ला
नाशिक : येत्या शनिवारी (दि.२४) शहरात काढण्यात येणाऱ्या मराठा समुदायाच्या मोर्चासाठी पोलीस दलाने सतर्क राहून मार्गदर्शकाची भूमिका बजवावी, असे आवाहन पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी केले.
मराठा आरक्षण, कोपर्डी बलात्काराचा निषेध आणि अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा या मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शहरात शनिवारी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी शहरात जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणावर आबालवृद्ध दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहराची वाहतूक व्यवस्था, सुरक्षाव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची बंदोबस्त आढावा बैठक गुरुवारी (दि.२२) दादासाहेब गायकवाड सभागृहात घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर पोलीस उपआयुक्त विजय पाटील, दत्ता कराळे, लक्ष्मीकांत पाटील, श्रीकांत धीवरे, सहायक आयुक्त सचिन गोरे, डॉ. राजू भुजबळ आदि उपस्थित होते. प्रारंभी दृकश्राव्य यंत्रणेमार्फत उपस्थित पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांना बंदोबस्ताचे सूक्ष्म नियोजन, वाहनतळाची व्यवस्था, वाहतूक मार्ग आदि बाबत माहिती देण्यात आली. शनिवारी दोन्ही परिमंडळांमध्ये पहाटे पाच वाजता पोलीस कर्मचारी हजर होतील आणि पोलीस ठाणे व सेक्टरनुसार वाहने घेऊन नियुक्तीच्या पॉइंटवर पोहचतील.
दरम्यान, पॉइंटचे वाटप पोलीस ठाण्यांमधून होणार असून, मोर्चादरम्यान रस्त्यांवरून कुठल्याही प्रकारची सरकारी वाहने फिरणार नाही, याची दक्षता घ्यावी. कुठेही कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याबाबत सतर्कता बाळगावी, पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वयंशिस्त पाळून देहबोलीचे भान ठेवावे आणि नागरिकांचे मार्गदर्शक म्हणून भूमिका पार पाडावी. पोलीस दलावर कोणालाही टीकेची संधी मिळेल
अशी वर्तणूक टाळा, मोर्चेकरी
शिस्तीत संचलन करणार असल्याने पोलिसांनी त्यांना मार्गदर्शन करावे. वाहतूक सुरळीत ठेवावी. परस्परांमध्ये समन्वय ठेवून कुंभमेळ्याच्या बंदोबस्ताचा अनुभवाचा वापर करून चोख नियोजनबद्धपणे मोर्चा हाताळावा, अशा सूचना सिंघल यांनी यावेळी केल्या.
‘कंट्रोल रूम’ला माहिती पुरवा
सकाळी दहा वाजेपासून सुरू होणारा मोर्चा तब्बल पाच ते सहा तास चालणार आहे. यामुळे बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला वेळोवेळी अद्ययावत माहिती पुरवावी. जेणेकरून संभाव्य गैरसोय टाळणे शक्य होईल, असे सिंघल यावेळी म्हणाले. नियंत्रण कक्षामधील कर्मचाऱ्यांनीदेखील महत्त्वाचे संदेश तत्काळ प्रसारित करावे. (प्रतिनिधी)