बीकॉमच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन घेतले मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:59 AM2019-07-13T00:59:22+5:302019-07-13T01:00:33+5:30
वाणिज्य शाखेच्या अंतिम वर्षाच्या (टी.वाय.बी.कॉम.) निकालात एकाच विषयात अनेक विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केल्यानंतर फेरतपासणीतही विलंब केल्याप्रकरणी नाशिकमधील ८०हून अधिक विद्यार्थ्यांनी पुकारलेले आंदोलन विद्यापीठाने फेरतपासणीचा निकाल जाहिर केल्यानंतर मागे घेण्यात आले.
नाशिक : वाणिज्य शाखेच्या अंतिम वर्षाच्या (टी.वाय.बी.कॉम.) निकालात एकाच विषयात अनेक विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केल्यानंतर फेरतपासणीतही विलंब केल्याप्रकरणी नाशिकमधील ८०हून अधिक विद्यार्थ्यांनी पुकारलेले आंदोलन विद्यापीठाने फेरतपासणीचा निकाल जाहिर केल्यानंतर मागे घेण्यात आले. या निकालात जवळपास निम्मेपेक्षा अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बीकॉमच्या निकालात मर्कंटाइल लॉ (एम.लॉ) या विषयात अनेक विद्यार्थ्यांना ७ जूनला लागलेल्या निकालात अनुत्तीर्ण करण्यात आले होते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांच्या पुनर्तपासणीसाठी अर्ज केला. मात्र, त्या प्रक्रियेतही प्रचंड विलंब करण्यात आल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी राष्टÑवादी विद्यार्थी कॉँग्रेसच्या नंदन भास्करे यांच्या नेतृत्वाखाली पुणे विद्यापीठाच्या नाशिकमधील उपकेंद्राच्या समन्वयकांना घेराव घातला होता. तसेच समन्वयकांना त्यांच्या दालनातच कोंडून ठेवत कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले होते.
दोन दिवस आंदोलन केल्यानंतर विद्यापीठाने अखेर फेरतपासणीचा निकाल जाहीर केला यामध्ये अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने आंदोलन थांबविण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला. दरम्यान, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अद्यापही समाधान झाले नसल्याने नाराजी कायम आहे.
काठावर उत्तीर्ण
विषयात उत्तीर्ण होण्यासाठी लेखी परीक्षेत ८० पैकी ३२ गुण मिळणे बंधनकारक आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले, त्यांना ३२ किंवा ३३ असेच गुणदिले आहेत. म्हणजे पुन्हा या फेरतपासणीतही अधिक पुरवण्या जोडलेले उत्तीर्ण आणि कमी पुरवण्या जोडलेले अनुत्तीर्ण असाच अंदाजे ‘निकाल’ लावण्यात आला असल्याचा आक्षेप विद्यार्थ्यांनी घेतला आहे. त्यामुळे निकाला लागला असला तरी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अजूनही समाधान झालेले नसल्याने विद्यार्थ्यांची पुढील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.