बीट मार्शल, गुन्हे शोध पथकाला मिळेना वाहन
By admin | Published: December 22, 2014 01:17 AM2014-12-22T01:17:04+5:302014-12-22T01:21:25+5:30
इंदिरानगर पोलीस ठाणे : गस्तच नसल्याने गुन्हेगारी वाढली
संजय शहाणे नाशिक
इंदिरानगर पोलीस ठाण्यातील बीट मार्शल आणि गुन्हे शोध पथकाकडे वाहनच नसल्याने परिसरातील गस्त थंडावली असून, गुन्हे शोध पथकाचे कामकाजही ठप्प झाले आहे़ पोलिसांची गस्तच होत नसल्याने परिसरातील गुन्हेगारांना मोकळे रान मिळाले असून, घरफोडी, चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे़ गेल्या महिनाभरापासून ही दोन्ही वाहने दुरुस्तीसाठी पाठविण्यात आल्याचे सांगितले जाते़
१ एप्रिल २०१० ला कार्यान्वित झालेल्या इंदिरानगर पोलीस ठाण्याची हद्द नासर्डी नदीपासून तर विल्होळी जकात नाक्यापर्यंत आहे़ तसेच शिवाजीवाडी, भारतनगर, नंदिनीनगर, राजीवनगर झोपडपट्टी, सावित्रीबाई फुले झोपडपट्टी, पिंगूळबाग, कवटेकरवाडीसह विविध वसाहती आहेत़ घरफोड्या, सोनसाखळी चोरी, तोतया पोलीस, विवाह समारंभातून दागिन्यांची चोरी अशा घटना परिसरात घडलेल्या आहेत़ गुन्हेगारीवरील नियंत्रणासाठी दोन पोलीस निरीक्षक, सुमारे पाच सहायक पोलीस निरीक्षक, सात उपनिरीक्षक यांच्यासह सुमारे ६० कर्मचारी सद्य:स्थितीत पोलीस ठाण्यात कार्यान्वित आहेत़
या परिसरातील नागरी वसाहतीत मोठ्या संख्येने वाढल्या असून, गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची संख्या अपुरी पडते आहे़ त्यातच दिवसा व रात्री गस्त घालणाऱ्या बीट मार्शलची वाहने नादुरुस्त झाली असून, गुन्हेशोध पथकाचे वाहनही वीस दिवसांपूर्वी नादुरुस्त झाल्याने ही वाहने दुरुस्तीसाठी पाठविण्यात आली आहे़ अद्यापही ही वाहने दुरुस्त झालेली नसल्याने पोलीस कर्मचाऱ्यांना तसेच गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांना आपल्या खासगी दुचाकी वाहनाद्वारे गस्त घालावी लागते़
पोलीस कर्मचारी स्वत:च्या वाहनाने गस्त घालीत असली तरी ती म्हणावी तशी आणि त्या पद्धतीने होत नाही़ त्यामुळे गुन्हेगारी वाढली असून, दोन दिवसांपूर्वीच घरफोडीत सहा तोळे सोने व पन्नास हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला होता़ याबरोबरच टवाळखोरांचाही उपद्रव वाढला असून, चारचाकीतून टेप चोरी होण्याचे, चारचाकीचे टायर चोरी जाण्याचे प्रकारही वाढीस लागले आहेत़ नागरिकांची सुरक्षितता व गुन्हेगारीवर जबर बसण्यास थोड्याफार प्रमाणात का होईना जरब बसविण्यास उपयुक्त ठरणाऱ्या गस्तीसाठी लवकरात लवकर वाहन मिळणे गरजेचे आहे़