महिला तलाठ्यासह ग्रामसेवकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 11:07 PM2021-03-17T23:07:44+5:302021-03-18T00:00:28+5:30
वणी : दिंडोरी तालुक्यातील ओझे शिवारात शेतजमिनीतील क्षतिग्रस्त विद्युत पोलचा पंचनामा करण्यासाठी गेलेल्या महिला तलाठी यांना दमदाटी करत मारहाण करुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ओझे येथील पाच संशयितांवर विनयभंगासह दंगलीचा गुन्हा दिंडोरी पोलिसात दाखल करण्यात आला आहे.
वणी : दिंडोरी तालुक्यातील ओझे शिवारात शेतजमिनीतील क्षतिग्रस्त विद्युत पोलचा पंचनामा करण्यासाठी गेलेल्या महिला तलाठी यांना दमदाटी करत मारहाण करुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ओझे येथील पाच संशयितांवर विनयभंगासह दंगलीचा गुन्हा दिंडोरी पोलिसात दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिंडोरी तालुक्यात ओझे ,कादवा म्हाळुंगी, वलखेड , पाडे अशा गावांच्या सज्जाचे कामकाज महिला तलाठी पाहतात. त्यांचे कार्यालय कादवा म्हाळुंगी येथे आहे व याठिकाणी ग्रामसेवक यांचेही कार्यालय आहे. दरम्यान ओझे शिवारात विद्युत पोल क्षतिग्रस्त झाल्याची माहिती महीला तलाठी यांना मिळाली. त्याचा पंचनामा करण्यासाठी त्या कादवा म्हाळुंगीचे ग्रामसेवक यांच्या बरोबर ओझे येथे गेल्या. त्या ठिकाणी विद्युत पोल व शेती क्षेत्राची पाहणी केली व पंचनाम्याचे सरकारी काम पूर्णत्वाच्या मार्गावर असताना याठिकाणी विलास माधवराव ढाकणे, सुनिल माधवराव ढाकणे, पोलिस पाटील भाऊसाहेब सोमनाथ ढाकणे , संदिप संपत बर्डे ,ऊद्धव सुनिल ढाकणे या सर्व संशयितांनी सरकारी कामात अडथळा आणून घेराव घातला तसेच अंगावर धाऊन जात मारहाण व शिवीगाळ केली. त्याचबरोबर महीला तलाठी यांचा विनयभंग केला व ग्रामसेवक यांना मारहाण करण्यात आली. यावेळी महिला तलाठी व ग्रामसेवक यांनी कशीबशी आपली सुटका करून घेतली.
संशयितात पोलीस पाटीलही
घटनेनंतर तलाठी व ग्रामसेवक यांनी दिंडोरी पोलीसात धाव घेऊन घडलेला प्रकार कथन केला. दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अनिल कुमार बोरसे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्परतेने महिला तलाठी यांची फिर्याद नोंदवून घेत पाच संशयीतांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान भाऊसाहेब ढाकणे हे ओझे येथील पोलीस पाटील असुन त्यांचाही संशयितात समावेश आहे.