लसीकरण करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 01:36 AM2021-09-18T01:36:17+5:302021-09-18T01:37:46+5:30
सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत पास्ते या गावांमध्ये लसीकरण सत्र सुरू असताना गावातील काही नागरिकांनी आरोग्य सेवक सूर्यवंशी यांच्याशी भांडण करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. भांडण सोडविण्यासाठी महिला आरोग्य सेविकांनी प्रयत्न केला असता, त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असून, संबंधितांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी बेमुदत लसीकरण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नाशिक : सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत पास्ते या गावांमध्ये लसीकरण सत्र सुरू असताना गावातील काही नागरिकांनी आरोग्य सेवक सूर्यवंशी यांच्याशी भांडण करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. भांडण सोडविण्यासाठी महिला आरोग्य सेविकांनी प्रयत्न केला असता, त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असून, संबंधितांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी बेमुदत लसीकरण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शुक्रवारी दुपारी हा प्रकार पास्ते गावात घडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अधिकाधिक लसीकरण करण्यात यावे अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्यामुळे सिन्नर तालुका आरोग्य विभागाच्या वतीने गावोगावी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली होती. पास्ते येथे लसीकरणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून आवाहन केले जात असताना, एका इसमाने आरोग्य कर्मचारी सूर्यवंशी यांच्याशी वाद घातला व त्यातून मारहाण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून आरोग्य सेविकांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न चालविला असता, त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकारानंतर मात्र पास्ते येथील लसीकरण बंद करण्यात आले. या घटनेचा सिन्नर तालुका जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेचे तीव्र निषेध केला असून, आजवर एका लसीकरण सत्रात जास्तीत जास्त शंभर लाभार्थी लसीकरण करावे असा शासनाचा नियम आहे. तरीदेखील काळाचे भान लक्षात घेता आमचे आरोग्य कर्मचारी तीनशे ते साडेतीनशे नागरिकांचे लसीकरण करत आहेत. यामागे नागरिकांचा जीव वाचविण्याचा हेतू असून, असे असतानाही आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाणीच्या कटू प्रसंगाला सामोरे जावे लागत असल्याने त्याच्या निषेधार्थ संबंधितांना अटक होऊन त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत सिन्नर तालुक्यातील कोविड लसीकरण मोहीम थांबविण्याचा निर्णय कर्मचारी संघटनेने जाहीर केला आहे.