लोकवर्गणीतून जामा मस्जिद परिसराचे सुशोभिकरण

By admin | Published: November 18, 2016 12:01 AM2016-11-18T00:01:15+5:302016-11-17T23:59:27+5:30

आदर्श : प्राथमिक उर्दू शाळेसह कब्रस्तान परिसराचाही कायापालट

Beautification of the Jama Masjid area in the public domain | लोकवर्गणीतून जामा मस्जिद परिसराचे सुशोभिकरण

लोकवर्गणीतून जामा मस्जिद परिसराचे सुशोभिकरण

Next

 लोहोणेर : शासनाच्या कोणत्याही निधीची वाट न पाहता देवळा येथील मुस्लीम बांधवांनी जामा मस्जिद ट्रस्टच्या माध्यमातून, लोकवर्गणीतून, श्रमदानातून तसेच टाकाऊपासून टिकाऊ सुंदरता म्हणून जामा मस्जिद, प्राथमिक उर्दू शाळा, कब्रस्थानच्या परिसराचे सुशोभिकरण करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
देवळा येथील मुस्लीम बांधवांनी १९८५ मध्ये जामा मस्जिद ट्रस्टची स्थापना केली. तत्कालीन देवळा ग्रामपालिकेने भावडी व कोलथी नदीकाठची, गावठाणची ४२ आर जागा ट्रस्टला दिली. मुस्लीम बांधवांनी शहरात नेहमीच जातीय सलोखा राखून सर्व धार्मिक व राष्ट्रीय सण, उत्सव, राष्ट्रीय पुरुषांच्या जयंती- पुण्यतिथी आदि उत्सव साजरे करून हिंदू-मुस्लीम समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
येथील ट्रस्टने शासनाच्या निधीची वाट न पाहता जामा मस्जिद, कब्रस्थान, प्राथमिक उर्दू शाळा,
क्रीडांगण परिसरात ‘टाकाऊतून टिकाऊ’ उक्तीप्रमाणे तसेच पर्यावरणाचे महत्त्व समजावून घेत संपूर्ण परिसरात भव्य बगीचा तयार केला आहे. भावडी व खटके संगमाच्या नदीकाठची सुसज्ज अशी भव्य वास्तू व नयनरम्य केलेला
परिसर यामुळे सर्वांचे मन भारावून जाते. सदर बगीच्यामध्ये आयुर्वेदिक, औषधी वनस्पती, शोभेची झाडे, फुलझाडे लावण्यात आली आहेत. पाण्याची मोठया प्रमाणात व्यवस्था आहे.
परिसरात दोन स्वतंत्र स्वच्छतागृह आहेत तसेच कब्रस्थान प्रवेशद्वार, मुलांसाठी स्वतंत्र क्रीडांगण यामुळे परिसराची शोभा वाढली आहे. पंतप्रधान स्वच्छ भारत सुंदर भारत अभियान, ग्रामस्वच्छता अभियान, पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन याबाबत शासनस्तरावरून मोठ्या प्रमाणात जनजागृती करूनही अद्याप समाजाला त्याचे महत्त्व पटलेले नाही. मात्र देवळा येथील जामा मस्जिद ट्रस्टने आपल्या उल्लेखनीय कार्यातून देवळा शहराच्या व परिसराच्या सौंदर्यात भर टाकून जातीय सलोख्याचे उत्तम उदाहरण दिले आहे.
जामा मस्जिद व परिसराला भेट देणारी प्रत्येक व्यक्ती ट्रस्टच्या कार्याने भारावून जाताना दिसत आहे, तर ट्रस्टच्या कार्याचा सर्वांनी आदर्श घ्यावा, अशा प्रकारचे प्रशस्तीपत्र देताना दिसत आहेत.
सदरच्या कार्यात जामा मस्जिदचे इमाम मौलाना सद्दाम हुसेन, जामा मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष सगीर शेख, उपाध्यक्ष अस्लम तांबोळी, हसन तांबोळी, रफिक मणियार, युनूस पठाण, लाला सय्यद, अकील शेख, मोईउद्दीन पठाण, इस्माईल तांबोळी, कबीर तांबोळी, सत्तार तांबोळी, रफिक पिंजारी, सांडूभाई पठाण, नईम शेख, असिफ शेख, अक्रम तांबोळी,
मोबीन तांबोळी, कासीम पठाण, अशरफ मणियार, पप्पू शहा आदिंसह सर्व मुस्लीम बांधवांचा सिंहाचा वाटा आहे. (वार्ताहर)

Web Title: Beautification of the Jama Masjid area in the public domain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.