अनुवादातून विविध भाषांशी सुंदर रियाज : अपर्णा वेलणकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 07:52 PM2018-10-14T19:52:24+5:302018-10-14T19:55:41+5:30
सार्वजनिक वाचनालय, नाशिकच्या वतीने सुरू असलेल्या ५१व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी (दि.१४) प्रा. वृंदा भार्गवे यांनी वेलणकर यांची प्रकट सर्वस्पर्शी मुलाखत घेतली. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजात वावरण्याची मिळालेली संधी, पत्रकारितेचा प्रवासापासून अनुवादक आणि संपादकापर्यंतच्या विविध टप्प्यांना स्पर्श करत सामाजिक प्रश्न व समस्यांवर विविध प्रश्नांची उत्तरे देताना वेलणकर यांनी धांडोळा घेतला.
नाशिक : मूळ लेखक त्याची भाषा, अनुभव आणि अनुवादाची भाषा या चार गोष्टींची सांगड घालण्याचे काम अनुवादक करत असतो; मात्र हे करताना अनुवादकाने नेहमी अदृश्य राहून भाषेवर विशेष लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे ठरते. अनुवादातून विविध भाषांशी सुंदर रियाज करता येतो. अनुवाद करताना मूळ लेखकाचा मालकी हक्क विसरता कामा नये, असे मत ‘लोकमत’च्या फिचर एडिटर व सावानाच्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या अध्यक्ष अपर्णा वेलणकर यांनी मुलाखतीतून मांडले.
सार्वजनिक वाचनालय, नाशिकच्या वतीने सुरू असलेल्या ५१व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी (दि.१४) प्रा. वृंदा भार्गवे यांनी वेलणकर यांची प्रकट सर्वस्पर्शी मुलाखत घेतली. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजात वावरण्याची मिळालेली संधी, पत्रकारितेचा प्रवासापासून अनुवादक आणि संपादकापर्यंतच्या विविध टप्प्यांना स्पर्श करत सामाजिक प्रश्न व समस्यांवर विविध प्रश्नांची उत्तरे देताना वेलणकर यांनी धांडोळा घेतला. यावेळी वेलणकर यांनी पत्रकारितेचा प्रवासाचा आरंभ सांगताना ज्येष्ठ पत्रकार व गुरूवर्य दत्ता सराफ यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. अकरावीला असताना त्यांनी कोल्हापूरमध्ये एक लेख लिहिण्यास सांगितले आणि तेथून माझ्या जीवनाच्या प्रवासाला वेगळे वळण मिळाले, असे त्या म्हणाल्या. इंग्रजीमधील शोभा डे यांचे सिलेक्टिव मेमरी हे पुस्तक वाचत असताना त्याचे मराठीत अनुवाद करावेसे वाटले. त्यानंतर मी एके का पुस्तकाचे अनुवाद करत गेले. अनुवादक वाचकांना दिसता कामा नये. अनुवादाची भाषा जरी मराठी असली तरी लिखाण क रणा-या व्यक्तिमत्त्वानुसार ती घडवावी लागते. अनुवाद एका भाषेमधून दुस-या भाषेचा प्रवास असल्याचे वेलणकर यांनी यावेळी सांगितले.
समाधान देणारे ललित लेखन कमी झाले
‘दीपोत्सवा’बाबत भार्गवे यांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात त्या म्हणाल्या, कथा, कविता, कादंबरी या साहित्याचे मला अजिबात वावडे नाही; मात्र वाचकांचे समाधान करणारे दर्जेदार ललित लेखन कमी झाले आहे, अशी खंत वेलणकर यांनी यावेळी व्यक्त केली. काळानुरूप दिवाळी अंकाचे स्वरूप बदलणे स्वाभाविक होते. अन्य दीवाळी अंक आणि ‘दीपोत्सव’ यांची तुलना करणे त्या दिवाळी अंकांवर अन्यायकारक ठरणारी असेल. दिवाळी अंकाचे महत्त्व हे त्यांच्या ठिकाणी तसेच असल्याचेही वेलणकर यांनी यावेळी सांगिलते.
‘#मी टू’ विषयी चिंता वाटते
स्त्रियांनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराविषयी धिटाईने समाजापुढे येऊन व्यक्त होण्याची ‘#मी टू’ नावाची चळवळ देशभरात सुरू झाली आहे. मनोरंजनाच्या दुनियेतील तारकेपासून या चळवलीला आरंभ झाला; मात्र या चळवळीविषयी मला चिंता वाटते, असेही वेलणकर यांनी ‘#मी टू’बाबतीत विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. स्त्रियांचा हा लढा शोषण, छळाविरुद्ध असायला हवा; मात्र दुर्दैवाने पुरुषांविरोधी असल्याचे दिसून येते. या चळवळीच्या माध्यमातून वयात येणाऱ्या मुलींसमोर आपण समाजातील पुरुषांविषयीची कोणत्या प्रकारची प्रतिमा उभी करत आहोत? याचाही विचार होणे गरजेचे आहे. चळवळीच्या माध्यमातून अन्यायाला वाचा नक्कीच फुटली पाहिजे; मात्र पुरुष विरुद्ध स्त्री असा लढा उभा राहता कामा नये, असे त्यांनी यावेळी अधोरेखित केले