पांडवलेणीचे सौंदर्य उजळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 12:24 AM2018-10-14T00:24:26+5:302018-10-14T00:24:55+5:30
राष्ट्रीय संरक्षित वारसास्थळांमध्ये समावेश असलेल्या भारतीय पुरातत्व विभागाच्या यादीमधील महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तूंपैकी एक असलेली पांडवलेणी उजळणार आहे.
अझहर शेख । लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : राष्ट्रीय संरक्षित वारसास्थळांमध्ये समावेश असलेल्या भारतीय पुरातत्व विभागाच्या यादीमधील महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तूंपैकी एक असलेली पांडवलेणी उजळणार आहे.
पुरातत्व विभागाने पांडवलेणीची पडझड रोखण्यासाठी तसेच पावसाच्या पाण्याने काळे पडलेले दगड रासायानिक प्रक्रियेद्वारे मूळ रंगात आणण्याचा प्रयत्न केला जाणार असून, त्यामुळे या लेण्यांच्या संवर्धनास मदत होणार आहे.
इ.स. १२००च्या दरम्यान या लेणी खोदल्या गेल्या असाव्यात, असे अभ्यासक सांगतात. पांडवलेणीत बौद्ध लेणी आहेत. पांडवलेणीची ‘त्रिरश्मी’ लेणी अशीही ओळख आहे. पांडवलेणी १९९६ साली केंद्रीय पुरातत्व विभागाने राष्टÑीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केली आहे. लेणीचा वारसा जपण्यासाठी पुरातत्व विभागाने पुढचे पाऊल उचलले आहे. लेणीची काळानुरूप दूरवस्था झाली आहे. पांडवलेणीचे सौंदर्यदेखील कमी होत चालले आहे. पुरातत्व विभागाने या लेणीच्या झळाली व दुरुस्तीचा स्वतंत्र प्रस्ताव तयार केला असून, दिवाळीनंतर प्रत्यक्षरीत्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती संरक्षण सहायक हर्षद सुतारिया यांनी दिली.
इतिहासावर पडणार प्रकाश
पांडवलेणीमधील बहुतांश ठिकाणी काही शिलालेख न वाचता येणारे आहेत. काळानुरूप व पावसाचे पाणी झिरपून दगडांमध्ये कोरलेले शिलालेखांवरील लिपी अदृश्य झाली आहे. हे शिलालेख रासायनिक प्रक्रियेद्वारे उजळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.