केशरी रंगाने खुलणार तपोवनाचे सौंदर्य
By Admin | Published: May 17, 2015 11:43 PM2015-05-17T23:43:33+5:302015-05-17T23:53:05+5:30
वातावरण निर्मितीवर भर : शाहीमार्ग, साधुग्राममध्ये उभारणार स्वागतस्तंभ, प्रवेशद्वार
नाशिक : ‘अशी झेप घ्यावी, असे सूर गावे, घुसावे ढगामाजि बाणापरी, ढगांचे अबोली भुरे केशरी रंग, माखून घ्यावेत पंखावरी’...कवयित्री पद्मा गोळे यांच्या या काव्यपंक्तीची आठवण अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात झाली नाही तर नवलच. कारण, ज्याठिकाणी साधू-महंतांचा डेरा पडणार आहे त्या तपोवनाचे सौंदर्य त्याग आणि उत्साहाचे दर्शन घडविणाऱ्या केशरी रंगाने खुलविण्याची तयारी महापालिका प्रशासनाने चालविली असून, साधुग्रामसह शाहीमार्गावर ठिकठिकाणी स्वागतस्तंभ आणि प्रवेशद्वाराच्या माध्यमातून केशरी रंगाची उधळण पाहावयास मिळणार आहे. महापालिकेने त्यासाठी सुमारे एक कोटी रुपये खर्चाची तयारी ठेवली आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शहरात तीन लाखांच्यावर साधू-महंत तसेच पर्वणीकाळात कोट्यवधी भाविक दाखल होणार आहेत. तपोवनात साधुग्राम उभारणीचे काम सुरू असून, नवीन शाहीमार्गाच्याही कॉँक्रीटीकरण व रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सिंहस्थ पर्वणीच्या महिनाभराच्या कालावधीत तपोवनासह शाहीमार्ग आणि गोदाघाटाच्या सौंदर्याच्यादृष्टीनेही महापालिकेने बारकाईने लक्ष घातले आहे. कुंभमेळा काळात चैतन्यमय आणि उत्फुल्ल वातावरणनिर्मितीवर भर देण्यासाठी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी शहरातील नामवंत कलादिग्दर्शक व नेपथ्यकार आनंद ढाकीफळे यांच्याकडून डिझाईन तयार करून घेतले असून, त्यानुसार शाहीमार्ग व गोदाघाटावर स्वागतस्तंभ आणि तपोवनात प्रवेशद्वार उभे केले जाणार आहेत. त्यासाठी ६१२ स्वागत स्तंभ आणि पाच ठिकाणी प्रवेशद्वार भाडेतत्त्वावर पुरविण्यासाठी सुमारे ९४ लाख रुपये खर्चाचे प्राकलन तयार करत निविदा मागविण्यात आल्या आहेत. सदर स्वागतस्तंभ आणि प्रवेशद्वार उभारताना सर्वत्र केशरी रंगाचाच प्राधान्याने वापर करण्यात येणार आहे. साधुग्राम व तपोवनातील मुख्य रस्ता, तसेच औरंगाबादरोडकडून संत जनार्धन स्वामी आश्रमाजवळ आणि पुणेरोडकडून येणाऱ्या रस्त्यावर लक्ष्मीनारायण पुलाजवळ २० फूट उंचीचे प्रवेशद्वार उभे केले जाणार आहेत. जेणेकरून या प्रवेशद्वारातून मुख्य मिरवणुकीसह अन्य वाहनांनाही वाट काढताना अडथळा निर्माण होणार नाही. त्याचप्रमाणे, तपोवनातील साधुग्रामसह शाहीमार्गाच्या दुतर्फा स्वागतस्तंभ उभे केले जाणार आहेत. याशिवाय शाहीमार्गावर केशरी रंगातच जागोजागी चौथरे उभे केले जाणार आहेत. या चौथऱ्यांवर सुहासिनी उभ्या राहून मिरवणुकीतील साधू-महंतांवर पुष्पवर्षाव करतील तसेच काही चौथरे पोलिसांना बंदोबस्तासाठी राखीव ठेवण्यात येतील. शाहीमार्ग आणि साधुग्राममध्येही सूचना व माहितीफलक उभे केले जाणार असून, त्यांचा रंगही केशरीच असणार आहे. याशिवाय लक्ष्मीनारायण पुलासह तपोवनातील चौकाचेही पेशवाई इफेक्टस्च्या माध्यमातून सौंदर्य खुलणार आहे. एकूणच सर्व वातावरणच केशरीमय केले जाणार असून, त्यानिमित्ताने एक वेगळेपण भाविकांच्या नजरेस पडणार आहे. (प्रतिनिधी)