विविध संस्थांकडून नारीशक्तीचा गौरव
By Admin | Published: March 7, 2017 01:44 AM2017-03-07T01:44:50+5:302017-03-07T01:45:04+5:30
नाशिक : जागतिक महिला दिनानिमित्त शहरातील विविध संस्था संघटनांच्या वतीने नारीशक्तीचा गौरव करण्यात येणार आहे.
नाशिक : जागतिक महिला दिनानिमित्त शहरातील विविध संस्था संघटनांच्या वतीने नारीशक्तीचा गौरव करण्यात येणार आहे. दरम्यान, काही सामाजिक संघटनांनी महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी, दि. ६ रोजी विविध क्षेत्रांतील महिलांचा सत्कार करण्यात आला. महिला आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. प्रत्येक क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने महिला कार्य करताना दिसतात. डॉक्टर, अभियंता, वकील या क्षेत्रांत तर महिला आहेतच, परंतु रिक्षाचालक, बसवाहक या क्षेत्रातील महिला नोकरी, व्यवसाय करत आहे. अशा सर्वक्षेत्रांतील कर्तृत्वान महिला गौरव महिलादिनानिमित्त होत आहे. आयकॉन फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ७ मार्च रोजी करण्यात येणार आहे. या सोहळ्यात अभिनेत्री तेजश्री प्रधान, नाट्य निर्मात्या लता नार्वेकर, गिर्यारोहक कृष्णा पाटील, हास्य योगाच्या मास्टर ट्रेनर आदिती वाघमारे, कवयित्री सुमती लांडे, महिलांच्या मंदिर प्रवेशासाठी लढणाऱ्या कृष्णा पाटील यांच्यासह अन्य अनेक महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. समाजसेवक छाया मोदी, पर्यावरण संवर्धक हंसा शाह, श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्ष विद्युलता पंडित यांच्यासह अन्य अनेक मान्यवरांचाही सत्कार करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र प्रबोधन जीवन गौरव पुरस्कार स्त्रीभ्रूणहत्त्या रोखणारे गिरीश लाड यांना प्रदान करण्यात येणार आहे.
स्वयंम फाउंडेशनचे स्वयंसिद्धा पुरस्कार
स्वयंम फाउंडेशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्ताने विविध क्षेत्रातील कर्तृत्वान महिलांना ‘स्वयंसिद्धा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. मंगळवार, (दि. ७) रोजी सायंकाळी ५ वाजता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या हस्ते महिलांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावर्षी डॉ. प्राची पवार (वैद्यकीय सेवा), डॉ. अपर्णा फरांदे (उद्योजक), न्यायमूर्ती सुचित्रा घोडके (विधीसेवा), सुरश्री दशककर (संगीत विशारद), वैशाली बालाजीवाले (पत्रकारिता), मीना निकम- पेरुळेकर (गायन), स्वराली देवळीकर (मिस महाराष्ट्र), आरती पाटील (खेळाडू), ललिता शिंदे (सामाजिक कार्यकर्त्या) या महिलांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन स्वयंम फाउंडेशनच्या अध्यक्ष मनीषा बागुल, सुलभा सांगळे, स्मिता इघे, कल्याणी कोशिरे, लीना शिंदे, मनीषा कोलते, डॉ. सुजाता घोषाल आदिंनी केले आहे.
रेडक्रॉस व सप्रेम फाउंडेशन पुरस्कार
इंडियन रेडक्रॉस सोसायटी, नाशिक शाखा आणि सुप्रेम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त महिलांचा गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. यंदा ज्योती वाघमारे यांचा सामाजिक, प्रा. डॉ. सुनीता घुमरे (शैक्षणिक), विद्या कुलकर्णी (कला), डॉ. आशालता देवळीकर (वैद्यकीय), शरयु देशमुख (उद्योग) आरती पाटील (क्रीडा) या पुरस्कारार्थींचा समावेश आहे.