लाइट नसल्याने मनपाची सभा सव्वा तास तहकूब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 11:15 PM2019-07-19T23:15:49+5:302019-07-20T00:10:37+5:30
राज्यातील ब दर्जाच्या सहभाग असलेल्या आणि सध्या स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नाशिक महापालिकेची महासभा शुक्रवारी (दि.१९) केवळ सभागृहात लाइट नाही आणि जनरेटर असूनही डिझेल संपलेले या कारणामुळे तहकूब करावी लागली. आधी पंधरा मिनिटे आणि नंतर एक तास सभा तहकूब करावी लागल्याने विरोधकांनी गोंधळ घालून प्रशासनाचा धिक्कार केला तसेच अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
नाशिक : राज्यातील ब दर्जाच्या सहभाग असलेल्या आणि सध्या स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नाशिक महापालिकेची महासभा शुक्रवारी (दि.१९) केवळ सभागृहात लाइट नाही आणि जनरेटर असूनही डिझेल संपलेले या कारणामुळे तहकूब करावी लागली. आधी पंधरा मिनिटे आणि नंतर एक तास सभा तहकूब करावी लागल्याने विरोधकांनी गोंधळ घालून प्रशासनाचा धिक्कार केला तसेच अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
महापालिकेची मासिक महासभा शुक्रवारी (दि.१९) सकाळी पार पडली. महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षेखाली कामकाज सुरू झाले, परंतु त्यावेळी विद्युत पुरवठा नव्हताच. तरीही कामकाज सुरू करून श्रद्धांजली आणि अभिनंदनाचे प्रस्ताव मंजूर झाले, परंतु वीजपुरवठा का नसल्याने नगरसेवकांनी संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता आणि अन्य कोणीही याठिकाणी उपस्थित नव्हते. त्यामुळे नगरसेवक अधिकच संतप्त झाले. विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी वीजपुरवठा का बंद आहे? आठ दिवसांपूर्वी सभेची घोषणा करण्यात आली, मग वीजपुरवठ्यातील दोष अगोदरच का शोधण्यात आले नाही, असा प्रश्न करीत बोरस्ते यांनी स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाºया महापालिकेची ही शोकांतिका असून, आयुक्तांना यावर जबाबदारी टाळता येणार नाही, असे सांगितले आणि वीजपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत सभेचे कामकाज तहकूब करावे, असे सांगितले. त्यानुसार सभा तहकूब करण्यात आली. दरम्यान, महापालिकेच्या मुख्यालयात जनरेटर आहे परंतु त्यासाठी डिझेल शिल्लक नसल्याचे कळाल्यानंतर नगरसेवक अधिकच संतप्त झाले.
त्यांनतर पंधरा मिनिटांनी कामकाज सुरू झाले असले तरी वीजपुरवठा खंडितच होता. काही पंखे सुरू झाले आणि पुन्हा बंद पडले. नगरसेवक लांबून सभेसाठी येतात आणि हा काय प्रकार आहे, असा प्रश्न करू लागले. त्यातच कार्यकारी अभियंता वनमाळी यांचे सभागृहात आगमन झाले. त्यामुळे नगरसेवकांनी उपरोधिकपणे टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. त्यांनी जनरेटर सुस्थितीत आहे, परंतु अचानक केबल फॉल्ट झाल्याने अडचण झाली. पंधरा मिनिटात केबल दुरुस्तीचे काम होईल, असे सांगितले. परंतु महापौरांनी आणखी एक तासासाठी कामकाज तहकूब केले. यावेळी विरोधकांनी निष्काळजी प्रशासनाचा धिक्कार असो अशा घोषणाही दिल्या.
उकाड्याने अधिकारीही हैराण
महापालिकेचे मुख्यालय १९९३ साली बांधण्यात आले. विधी मंडळाच्या धर्तीवर त्याची रचना आहे. त्यात सभागृहात केवळ पंखे असून एसी किंवा एअर कूलर नाही. आता उष्णता वाढू लागल्यानंतर त्यात एअर कुलर बसविण्याचा ठराव गेल्यावर्षीच मंजूर झाला आहे. परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. सभागृहातील अनेक पंखे बंद आहेत. गेल्या महासभेत उकाड्याने नगरसेवक आणि अधिकारी हैराण झाले होते. त्यात यंदाच्या महासभेत वीज पुरवठा खंडित आणि जनरेटरही सुरू नसल्याने नगरसेवक अधिक संतप्त झाले.
महापालिकेचे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकरण गाजल्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक आणि सातपूर प्रभाग समितीचे सभापती संतोेष गायकवाड यांनी तातडीने एक कविता तयार करून सभागृहात सादर केली.
‘आली लाइट, गेली लाइट
मनपा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची
सभागृहात झाली फाइट,
महासभा तहकूब करून महापौरांनी सर्वांना केले क्वाइट (शांत)
आली लाइट, गेली लाइट...’
असह्य उकाड्यामुळे हैराण झालेल्या नगरसेवक आणि अधिकाºयांवर या विनोदी कवितेने हास्य तुषार उडाले.