जिल्हा बॅँकेमुळे अडकले लाभार्थ्यांचे धनादेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 06:53 PM2017-08-18T18:53:31+5:302017-08-18T19:01:55+5:30
नाशिक : समाजकल्याण विभागाच्या अधिनस्त असलेल्या योजनांचा थेट निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाची अडचण असल्याचे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या बैठकीत उघड झाले.
समाजकल्याण सभापती सुनीता रामदास चारोस्कर यांच्या उपस्थितीत समाजकल्याण विभागाची मासिक बैठक झाली. बैठकीत समाजकल्याण विभागाच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. पंचायत समिती स्तरावर बहुतांश निधी अखर्चित असून हा निधी अद्याप खर्च का केला नाही? याचा जाब सभापती सुनीता चारोस्कर यांनी अधिकाºयांना विचारला. ज्या योजनांचा खर्च झाला नाही. त्या योजनांचा निधी वेळेत खर्च झाला नाही, तो शासनाला परत करण्याच्या सूचना सुनीता चारोस्कर यांनी दिल्या. अपंगांचा तीन टक्के निधी खर्च करण्याबाबत पंचायत समिती स्तरावर उदासिनता असून, योजनांचा प्रचार व प्रसार करण्यात गटविकास अधिकारी कमी पडत असल्याने योजनांचे फलक पंचायत समिती बाहेर लावण्याच्या सूचना गटविकास अधिकाºयांना देण्याबाबत आदेश सभापती सुनीता चारोस्कर यांनी दिले. तसेच तीन टक्के अपंग निधीतून जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात ३० लाख रूपये खर्चून उदवाहक (लिफ्ट) बसविण्यास अपंग कल्याण आयुक्तांनी मान्यता दिल्याने त्याबाबतची कार्यवाही तात्काळ करण्याच्या सूचना दिल्या. दलीतवस्ती सुधार योजनेतर्गंत२ ६३४ कामांना १० टक्के निधी देणे बाकी असून, ७७ कामे अद्याप सुरूच झालेली नाही. ही कामे तात्काळ रदद करून त्या कामांचा निधी शासनाला परत करण्याच्या सूचना सभापती सुनीता चारोस्कर यांनी दिल्या. समाजकल्याण विभागाच्या अधिनस्त किती लाभार्थी आहेत. त्यांच्यावर किती खर्च होत आहे, याची माहिती आठ दिवसात देण्याची मागणी सदस्य हिरामण खोसकर यांनी केली. सर्वात महत्वाचे म्हणजे समाजकल्याण विभागाच्या योजनांमधील लाभार्थ्यांच्या खात्यात थेट लाभ जमा होत आहे. मात्र जिल्हा बॅँकेचे धनादेश वटत नसल्याने या लाभार्थ्यांच्या खात्यात योजनांच्या अनुदानाचे पैसे जमा झालेले नाहीत. अशा लाभार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाकडे पाठपुरावा करून त्यांच्या खात्यात आरटीजीएसने पैसे जमा करून घेण्याची मागणी करावी, अशा सूचना सभापती सुनीता चारोस्कर यांनी केली.