भाजपा आमदाराची प्रतिष्ठा पणाला
By admin | Published: February 12, 2017 10:56 PM2017-02-12T22:56:53+5:302017-02-12T22:57:07+5:30
नागरिकांचा मागासप्रवर्गात रंगणार लढत; कार्यकर्त्यांच्या बंडखोरीचे आव्हान
संदीप झिरवाळ पंचवटी
उमेदवारी नाकारल्यामुळे पक्षांतर्गत झालेली गटबाजी, आमदार बाळासाहेब सानप यांच्याच निकटवर्तीयांनी भाजपाला रामराम ठोकून वेगळा गट तयार करून कोणी शिवसेनेत, तर कोणी मनसेत प्रवेश करून भाजपासमोर आव्हान ठाकण्यासाठी उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. जो येईल त्याला उमेदवारीचा शब्द सानप यांनी दिला खरा, मात्र ऐनवेळी सानप यांनी शब्द न पाळल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी करून थेट सानप यांनाच आव्हान दिले आहे. प्रभाग क्रमांक ३ मध्ये सानप यांचे पुत्र मच्छिंद्र सानप हे नागरिकांचा मागासप्रवर्ग गटातून रिंगणात असल्याने आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
अ नागरिकांचा मागासप्रवर्ग गटातून
भाजपाकडून आमदार सानप यांचे सुपुत्र मच्छिंद्र सानप, राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक समाधान जाधव, शिवसेनेकडून विलास आव्हाड, मनसेचे संदीप भवर उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. या गटात खरी लढत ही सानप व समाधान जाधव यांच्यात होण्याची दाट शक्यता आहे. सानप हे भाजपा विद्यमान आमदार, शहराध्यक्ष असल्याने त्यातच गेल्या चार पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी स्वत: या प्रभागाचे नेतृत्व
केल्याने त्यांनी मुलाला रिंगणात उतरविले आहे, तर जाधव यांनी सलग दोनवेळा प्रभागाचे लोकप्रतिनिधित्व केले आहे.
ब सर्वसाधारण महिला गटातून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या विद्यमान नगरसेवक सुनीता शिंदे, भाजपाच्या प्रियंका माने, शिवसेनेच्या प्रमिला शेवाळे यांच्यासह अपक्ष रेणुका घोडे, हेमलता वाघ यांच्यात लढत दिली असली तरी खरी लढत ही शिंदे व माने यांच्यातच होण्याची शक्यता आहे.
क सर्र्वसाधारण महिला गटातून मनसेकडून विद्यमान नगरसेवक ज्योती गांगुर्डे, भाजपाकडून कुसूम शिंदे, शिवसेनेकडून पूनम मोगरे निवडणूक लढवित आहेत. राष्ट्रवादीने याठिकाणी महिला उमेदवार दिलेला नाही. गांगुर्डे या पूर्वी भाजपाच्या असल्या तरी त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर मनसेत प्रवेश केला आहे.
ड सर्वसाधारण गटातून विद्यमान नगरसेवक रूचि कुंभारकर, शिवसेनेकडून हर्षद पटेल, राष्ट्रवादीकडून गौरव गोवर्धने, मनसेचे सोमनाथ बोडके हे निवडणूक रिंगणात आहेत. गेल्यावेळी मनसेचे रेल्वे इंजिन जोरात धावल्याने कुंभारकर निवडून आले होते. या गटातील लढत ही भाजपाविरुद्ध अन्य पक्षांची आहे. याच गटात अन्य अपक्ष असले तरी ते पाहिजे तसा टिकाव धरू शकणार नसल्याचे बोलले जाते.