बीएड विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रावर ‘वणवण’, पोर्टलवरून चुकीची माहिती
By श्याम बागुल | Published: April 26, 2023 07:58 PM2023-04-26T19:58:26+5:302023-04-26T19:59:38+5:30
राजकीय दणक्याने घेतली परीक्षा
श्याम बागुल, नाशिक: शासनाच्या बीएडसाठी (शिक्षण शास्त्र पदवी अभ्यासक्रम) प्रवेश पूर्व परीक्षेसाठी खान्देशातून दोनशे ते अडीचशे किलोमीटरवरून नाशकात आलेल्या सुमारे दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांची बुधवारी (दि.२६) सल्लागार कंपनीच्या चुकीमुळे ससेहोलपट झाली. परीक्षेसाठी हॉल तिकीट हाती असूनही परीक्षा केंद्रावर कोणतीही तयारी नसल्याचे व त्याच बरोबर एकदिवस अगोदरच परीक्षा झाल्याचे या विद्यार्थ्यांना सांगण्यात आल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. अखेर परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या मदतीला राजकीय पक्षाचे पदाधिकारी धावून आल्याने त्यांच्या परीक्षेचा मार्ग सुकर झाला.
शिक्षण शास्त्र पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यापूर्वी प्रवेश पूर्व परीक्षा (सीईटी) देणे क्रमप्राप्त असल्यामुळे पंचवटीतील हिरावाडी येथील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयात बुधवारी (दि. २६) सकाळी नऊ ते साडेदहा वाजेच्या दरम्यान प्रवेश पूर्वपरीक्षा आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या खासगी कंपनीने परीक्षार्थी विद्यार्थ्यांना हॉल तिकीट प्रदान करून परीक्षेसाठी २६ एप्रिल तारीख देण्यात आली होती. हॉल तिकीट मिळाल्याने खान्देशातील जळगाव, पाचोरा, भडगाव, शिंदखेडा, नवापूर आदी भागातून सुमारे दोनशेहून अधिक विद्यार्थी सकाळी परीक्षा केंद्रावर दाखल झाले असता, परीक्षा मंगळवारीच होऊन गेल्याचे महाविद्यालयाकडून सांगण्यात आल्याने दोनशे किलोमीटर दूरवरून आलेल्या विद्यार्थ्यांच्या पायाखालची वाळू सरकली.