‘फ्रंटलाइन वर्कर्स’करिता बेड राखीव ठेवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:13 AM2021-05-01T04:13:12+5:302021-05-01T04:13:12+5:30
शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. रुग्णांची वाढती संख्या प्रशासनाला चिंतित करणारी आहे. अशा स्थितीत फ्रंटलाइनवर राबणारे हात सुरक्षित ...
शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. रुग्णांची वाढती संख्या प्रशासनाला चिंतित करणारी आहे. अशा स्थितीत फ्रंटलाइनवर राबणारे हात सुरक्षित रहावे आणि त्यांना उपचाराची गरज भासल्यास त्यांची किंवा त्यांच्या नातेवाईकांची परवड होऊन जेणेकरून त्यांच्यासारख्या अनेकांचे मनोबल ढासळणार नाही, यासाठी पांडेय यांनी स्वतंत्र आदेश काढले आहेत. फ्रंटलाइनवर कार्यरत असलेल्या घटकातील अधिकारी, कर्मचारी कोरोनाबधित झाल्यास त्याला उपचारासाठी विलंब होणार नाही, यासाठी बेड्स आरक्षित ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
गेल्या वर्षापासून आतापर्यंत शहर पोलीस दलातील ६७१ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सद्यस्थितीत १६० पोलीस अधिकारी व कर्मचारी बाधित असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुर्दैवाने ११ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गामुळे आपले प्राण गमवावे लागले आहे. अलीकडे वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे फ्रंटलाइन वर्कर्सलाही बेड्ससाठी वणवण भटकावे लागत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. आपल्यासह कुटुंबीयांना बेड्स आणि उपचार मिळण्याची शाश्वती असल्यास फ्रंटलाइन वर्कर प्राधान्याने आपले कर्तव्य चोखपणे बजावतील. त्यामुळे हे आदेश काढण्यात आल्याचे पांडेय यांनी स्पष्ट केले आहे. हा आदेश आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व सरकारी रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयांना बंधनकारक करण्यात आला आहे. या निर्णयाची माहिती शहरातील हॉस्पिटल्स प्रशासनाला लेखी स्वरूपात देण्याची जबाबदारी १३ पोलीस ठाण्यांसह महापालिका प्रशासनाकडे सोपविण्यात आली आहे.