नाशिक : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भिकाऱ्यांची रवानगी होणार निवारा केंद्रात
By Suyog.joshi | Published: January 10, 2024 04:24 PM2024-01-10T16:24:28+5:302024-01-10T16:27:23+5:30
एकही भिकारी शोधून सापडणार नाही अशा स्पष्ट सूचना मनपा आयुक्तांनी यंत्रणेला दिल्या आहेत.
नाशिक : राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशकात येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा म्हणजे भिकाऱ्यांसाठी ‘अच्छे दिन’ ठरणार आहे. पंचवटीसह शहरातील सर्वच भिकाऱ्यांची रवानगी थेट निवारा केंद्रात केली जात आहे. एकही भिकारी शोधून सापडणार नाही अशा स्पष्ट सूचना मनपा आयुक्तांनी यंत्रणेला दिल्या आहेत. त्यामुळे अतिक्रमण विभागाकडून शहरातील भिकारी शोधण्यासाठी जोरदार शोध मोहीम राबवली जात आहे. निवारा केंद्रात भिकाऱ्यांना दोनवेळचे जेवण, रात्री झोपण्यासाठी व्यवस्था व थंडीपासून बचावासाठी ब्लेकटही दिले जात आहे. पंतप्रधान मोदी शुक्रवारी (दि.१२) युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी नाशिकमध्ये येणार असून तपोवनातील मैदानावर हा सोहळा होणार आहे.
मनपा आयुक्तांनी पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यात शहरात कुठेही भिकारी दिसता कामा नये असे आदेश अतिक्रमण विभागाला दिले आहेत. फर्मान जारी होताच अतिक्रमण विभागाने भिकाऱ्यांची धरपकड सुरु केली आहे. भिकारी दिसताच त्याला निवारा केंद्रात नेले जात आहे. विशेषत: पंतप्रधानांचा दौरा हा पंचवटी परिसरात आहे. या ठिकाणी रामकुंड, गोदा घाट व अनेक मंदिरे असून या ठिकाणी भिकाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अनेक भाविक व पर्यटक या ठिकाणी भेट देत भिकाऱ्यांना अन्नदान व पैसे देतात. त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह होतो.
पोलिसांकडून भिकाऱ्यांची तपासणी
शहरात महापालिकेच्यावतीने दोन ठिकाणी निवारा केंद्र उभारली आहेत. तपोवन व गाडगे महाराज धर्मशाळेत निवारा केंद्र आहे. साधारण दोन्ही केंद्रात सद्यस्थितीत ३०० भिकारी आहेत. त्यामुळे अजून एक दोन दिवसात त्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दौर्यामुळे तपोवन निवारा केंद्रातील सर्व आश्रितांची पोलिसांकडून सुरक्षेच्या कारणास्तव तपासणी केली जात आहे. सर्व भिकाऱ्यांना गाडगे महाराज धर्मशाळेत ठेवले जाणार आहे.