जिल्ह्यातील पाण्याचा स्रोत तपासण्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 01:00 AM2019-10-06T01:00:48+5:302019-10-06T01:01:15+5:30
नाशिक : ग्रामीण भागातील जनतेचे दूषित पाण्यापासून होणाऱ्या आरोग्याचा धोका टाळण्याबरोबरच त्यांचे आरोग्यमान उंचावण्याच्या दृष्टीने यावर्षीही आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील जलस्रोतांची मोबाइल अॅपद्वारे रासायनिक जैविक तपासणीस सुरुवात करण्यात आली आहे. १ आॅक्टोबरपासून सुरू झालेल्या या अभियानात महिनाभरात ७,३९३ स्रोतांचे पाणी नमुने गोळा करण्यात येणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : ग्रामीण भागातील जनतेचे दूषित पाण्यापासून होणाऱ्या आरोग्याचा धोका टाळण्याबरोबरच त्यांचे आरोग्यमान उंचावण्याच्या दृष्टीने यावर्षीही आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील जलस्रोतांची मोबाइल अॅपद्वारे रासायनिक जैविक तपासणीस सुरुवात करण्यात आली आहे. १ आॅक्टोबरपासून सुरू झालेल्या या अभियानात महिनाभरात ७,३९३ स्रोतांचे पाणी नमुने गोळा करण्यात येणार आहेत.
नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने ‘जिल्हा पाणी स्वच्छता मिशन’ हा उपक्रम राबविण्यात येत असून, त्यात शुद्ध व निर्जंतुक पाणी ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्यासाठी पावसाळ्यापूर्वी आणि नंतर स्वच्छता सर्वेक्षण अभियान राबविले जाते. सध्या जिल्ह्णात सुमारे ७,३९३ जलस्रोत असून, या सर्व स्रोतांची तपासणी याद्वारे होणार आहे. यासाठी सर्व तालुक्यांना सूचना देण्यात आल्या असून, अनेक तालुक्यांमध्ये या कामास सुरुवातही झाली आहे. रासायनिक पाणी नमुने तपासणी अभियानाचे काम जिल्ह्यात शंभर टक्के पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. त्यानुसार हे अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा व तालुका कक्षाचे तज्ज्ञ सल्लागार यांच्या मदतीने कक्षाच्या पाणी व गुणवत्ता सल्लागार या अभियानाचे सनियंत्रण करत असून, या अभियानात जलसुरक्षकांनी ग्रामपंचायत परिसरातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे नमुने ग्रामसेवक, आरोग्य सेवक, आरोग्य सहायक यांच्या सहकार्याने जिओ फेन्सिंग मोबाइल अॅपद्वारे गोळा करावयाचे आहेत. गोळा करण्यात आलेल्या पाणी नमुन्यांची रासायनिक तपासणी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणांच्या उपविभागीय प्रयोगशाळांतून करण्यात येणार आहे.
सदर अभियानात विहित नमुने आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आले असून, त्याद्वारे पाण्याचा स्त्रोतांचा परिसर, योजनेमधील गळती, पाणी शुद्धीकरण याबाबतची प्रत्यक्ष पाहणी करून आलेल्या जोखमीप्रमाणे ग्रामपंचायतीस पाणी गुणवत्तेविषयी जोखीम निश्चित करण्यात येणार आहे. त्याआधारे ग्रामपंचायतीस लाल, पिवळे व हिरवे कार्ड देण्यात येणार आहे. याबाबत शनिवारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांनी आरोग्य विभागातील तालुकास्तरीय यंत्रणेची बैठक घेऊन शासन निकषाप्रमाणे
स्वच्छता सर्वेक्षण करण्याचे व तालुकास्तरावरून त्याची फेरपडताळणी करण्याची निर्देश दिले.अशी होणार तपासणी
सार्वजनिक पिण्याच्या स्रोतांचे सॅटेलाइटद्वारे टॅग करण्यासाठी शासनाने नागपूर येथील संस्थेला जबाबदारी दिली आहे. जिओफेन्सिंग हे एक मोबाइल अॅप असून, हे अॅप सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे नमुने गोळा करण्यासाठी वापरतात. स्रोतांच्या दहा मीटर परिघात गेल्यावर अॅप सुरू करून त्याद्वारे स्रोत जिओ टॅग करण्यात येऊन फोटो घेऊन नमुना घेण्यात येतो. याद्वारे जिल्ह्यात किती पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची तपासणी झाली, किती पिण्याच्या पाण्याचे स्रोत रासायनिक तपासणीसाठी शिल्लक राहिले याची माहिती मिळते.