मार्चच्या प्रारंभीच गुळवंचला टंचाईच्या झळा महिलांची वणवण : विहिरींनी गाठला तळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 11:58 PM2018-03-03T23:58:00+5:302018-03-03T23:58:00+5:30
गुळवंच : सिन्नर तालुक्यातील गुळवंच शिवारातील विहिरींनी तळ गाठला असून, मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
गुळवंच : सिन्नर तालुक्यातील गुळवंच शिवारातील विहिरींनी तळ गाठला असून, मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांवर वणवण भटकंती करण्याची वेळ आल्याचे चित्र आहे. गुळवंच येथील सार्वजनिक विहिरीत जेमतेम पाणी आहे. सार्वजनिक विहिरीत थोडेफार पाणी असूनही ते पिण्यायोग्य नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रतन इंडिया कंपनीने दिलेल्या दोन विहिरीत पाणी नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनाला पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा प्रस्ताव तयार करण्याची वेळ आली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा प्रस्ताव पाठविल्यानंतर त्वरित टँकर मंजूर होईल का याची शंका उपस्थितीत केली जात आहे. मात्र पिण्याच्या पाण्यासाठी महिलांनी भटकंती करण्याची वेळ आल्याने पंचायत समिती व तहसील कार्यालयाने येथे निर्माण झालेली टंचाई पाहून तातडीने टॅँकर सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बारागांव पिंप्रीसह सात गाव पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात असून, केपानगर येथील जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण होईपर्यंत ही योजना चालू होण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे. टॅँकर सुरू करण्यापेक्षा योजना सुरू झाल्यास या गुळवंचसह योजनेत समाविष्ट असलेल्या सातही गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटेल यासाठी योजनेचे काम लवकर मार्गी लावण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.