मुल्हेरला रासक्रीडा उत्सवास प्रारंभ

By admin | Published: October 27, 2015 10:18 PM2015-10-27T22:18:29+5:302015-10-27T22:19:24+5:30

मुल्हेरला रासक्रीडा उत्सवास प्रारंभ

The beginning of the Mulhera Rascida Festival | मुल्हेरला रासक्रीडा उत्सवास प्रारंभ

मुल्हेरला रासक्रीडा उत्सवास प्रारंभ

Next

मुल्हेर : सातशे वर्षांची परंपरा असलेला मुल्हेर (ता. बागलाण) येथील रासक्रीडा उत्सवास मंगळवारी (दि. २७) आश्विन पौर्णिमेच्या शुभमुहुर्तावर उद्धव महाराज समाधी मंदिरात झाला. धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व असलेला हा सोहळा मुल्हेर येथे मोठ्या श्रद्धेने व निष्ठेने अखंडपणे साजरा होत आहे.
केळीच्या पानांनी व झेंडूच्या फुलांनी सजविलेले पंचवीस फूट व्यासाचे मोठे चक्र सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी सूर्य व चंद्राच्या साक्षीने हजारो भाविकांच्या उपस्थितीत ‘उद्धव महाराज की जय’ च्या जयघोषात रासस्तंभावर चढविण्यात येते. हे चक्र म्हणजे मंडल होय. याच मंडलाखाली श्रीकृष्ण व गोपिका वृंदावनात रासक्रीडा खेळत. या मंडलाचे प्रतीक म्हणजे हे रासचक्र आहे आणि गोपी-कृष्णाच्या निस्सीम प्रेमाचे प्रतीक म्हणजे ही रासक्रीडा आहे.
आख्यायिकेनुसार महाभारत काळातील मयूरनगरीचा
म्हणजेच मुल्हेरचा राजा मयूरध्वज याने इ.स.पूर्व ३००० मध्ये हा उत्सव
सुरू केला, तर उपलब्ध पुराव्याच्या आधारे उद्धव महाराजांचे
गुरू काशिराज महाराज यांनी १६४० पासून या उत्सवास व्यापक स्वरूप दिले.
रासस्तंभावर चक्र चढल्यानंतर पूजा आरती संपन्न होऊन, रात्री राधा, कृष्ण व गोपिकांची मिरवणूक काढण्यात येते. यात नवसाने झालेली मुलं, मुली गोपिकांच्या वेषात सहभागी होतात. रात्रभर अविश्रांतपणे ब्रज भाषेतील १०५ रासक्रीडेची भजने गायली जातात. परंपरागत व दुर्मीळ अशा शास्त्रीय रागांचा यात समावेश असतो.
भजनातील झांज आकाराने मोठे व वजनाने जड असतात. पखवाजही कर्नाटकी पद्धतीचा मोठा वापरला जातो. सकाळी रासचक्र उतरल्यावर या सोहळ्याची सांगता होते.
सर्व जातिधर्माच्या लोकांचा सहभाग या उत्साहाचे वैशिष्ट्य
असून, प्रत्येकास परंपरेनुसार कामे वाटून दिली आहेत. त्यानुसार सर्व
जण आपापली कामे पार पाडतात.
या नेत्रदीपक सोहळ्यासाठी गुजरात, मध्य प्रदेशसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक येथे हजेरी लावतात. (वार्ताहर)

Web Title: The beginning of the Mulhera Rascida Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.