‘पुनश्च हरिओम’ची सुरुवात; मात्र स्वनियमन गरजेचे!
By किरण अग्रवाल | Published: June 6, 2020 10:02 PM2020-06-06T22:02:24+5:302020-06-07T00:52:11+5:30
कोरोनामुळे घातली गेलेली शहरबंदी आता उठू लागली असली तरी त्याचा अर्थ धोका टळला आहे असा नाही. आता संपर्क वाढणार तसा संसर्गही वाढण्याची शक्यता नाकारता येऊ नये. हे टाळायचे असेल तर स्वत:लाच स्वत:च्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी लागेल. अन्यथा ‘पुनश्च हरिओम’ करता करता ‘हे राम’ म्हणण्याची वेळ येईल.
सारांश।
कोरोना हा काही जा म्हणता जाणारा नाही. त्यामुळे कोरोनासोबतच जगण्याची आपल्याला सवय करावी लागणार आहे हे वास्तव लक्षात घेऊन ‘लॉकडाऊन’ हळूहळू शिथिल केले जात आहे. परंतु सारे सुरळीत होऊ पाहतेय म्हणून बिनधास्त होत वावरणे धोक्याचेच ठरणार आहे. आपल्याकडील बाधितांचे वाढते प्रमाण व बळींचीही संख्या बघता भय दूर झालेले नाही. तेव्हा ‘आपणच आपले रक्षक’ या संकल्पनेनुसार प्रत्येकाला काळजी घ्यावी लागणार आहे, मात्र ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ न पाळणाऱ्या दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्याची वेळ ओढावल्याचे पाहता, कसे होणार आपले, असा प्रश्न पडणे स्वाभाविक ठरून गेले आहे.
‘कोरोना’शी झुंजता झुंजता सुमारे अडीच महिने होत आले, परंतु बाधितांचे व बळींचेही आकडे वाढतच आहेत. गेल्या पंधरा दिवसांत तर देशातील बाधितांची संख्या लक्षणीय वाढली आहे. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे देशातील एकूण बळींपैकी ४८ टक्के संख्या महाराष्ट्रातील आहे व यात मुंबई, पुणे, ठाणे, सोलापूर, औरंगाबादपाठोपाठ नाशिक जिल्ह्यातील संख्या आहे. राज्यातील मृत्यूदर ३.४८ टक्के इतका असताना नाशिक जिल्ह्यात तो ६ टक्क्यांवर गेला आहे, जो मालेगावात ७ टक्के आढळतो. बाधित रुग्ण व मृत्यूची संख्या यांच्या टक्केवारीत हा दर इतर ठिकाणांहून काहीसा अधिक असल्याने गाफिल राहून चालणारे नाही. शासन-प्रशासनाने ‘लॉकडाऊन’ केले, जिथे बाधित रुग्ण आढळला तो परिसर ‘सील’ केला; परंतु हे सर्व केले जात असताना नागरिकच स्वत:ची काळजी न घेता वावरणार असतील तर ‘कोरोना’ घरात शिरणारच ! मालेगाव तसेच नाशिक शहरातील अंबड व वडाळागाव भागात एकेका घरातच एकापेक्षा अधिक व मनमाडमध्ये तर चक्क एकाच कुटुंबातील १३ जण बाधित आढळण्याचे प्रकार पाहता, व्यक्तिगत पातळीवर पुरेशी खबरदारी
घेतली जात नसल्याचेच स्पष्ट होणारे आहे. लक्षणे आढळूनही त्याकडे दुर्लक्ष करण्याच्या किंवा लपवण्याच्या प्रकारातून हे ‘आ बैल मुझे मार...’ घडून येते आहे, हे येथे लक्षात घ्यायला हवे.
महत्त्वाचे म्हणजे, जिल्ह्यात कोरोनाबाधितांवर उपचार केले गेल्यानंतर ते बरे होण्याचे प्रमाण ६८ टक्के आहे, जे समाधानकारक ठरावे. अर्थात, यामागे वैद्यकीय यंत्रणेचे परिश्रम व सेवा आहे. स्वत:ला होऊ शकणाºया संसर्गाची चिंता न बाळगता हे योद्धे कोरोनाशी लढत आहेत. आपल्याकडे गावोगावचे व घरोघरीचे आरोग्य सर्वेक्षणही प्रभावीपणे झाले. आरोग्य सेवकांसोबत आशा सेविकांचा वाटा यात महत्त्वाचा आहे. अर्थात, तरी काहींना वाचवता आले नाही हे दु:खदायी आहे. साधे नाशकातले उदाहरण घ्यायचे तर काही ठरावीक भागात जी वाढ-विस्ताराची स्थिती दिसते, ती सार्वत्रिक नाही. महापालिका प्रशासन प्रभावीपणे उपाययोजना करीत आहे, तर जिल्ह्यात अनेक गावांनी स्वत:हून पुढाकार घेत संपर्क व त्यातून होऊ शकणाºया संसर्गाला रोखण्याच्या भूमिकेतून ‘गावबंदी’ केल्याने परिस्थिती आटोक्यात आहे. मालेगावमध्येही नाही म्हणता स्थिती काबूत येताना दिसत आहे. तेव्हा जे घडून गेले ते दुर्दैवी असले तरी, यापुढील सावधानता अधिक महत्त्वाची ठरणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘पुनश्च हरिओम’चा निर्णय घेतला आहे. नागरिकांची अडचण व कामाचा खोळंबा होऊ नये म्हणून काही अटी-शर्थींवर हे ‘अनलॉक’ होणार असले तरी प्रत्येकाने स्वत:च स्वत:ची काळजी घेणे यात अपेक्षित आहे. सर्व काही बलप्रयोगाने किंवा कायद्याने निगराणीत आणता येत नाही. त्यासाठी व्यक्ती व्यक्तीला सामाजिक भान असणे गरजेचे आहे. दुकाने उघडण्यास परवानगी मिळाल्याने बाजारपेठा गजबजणार आहेत. उद्याने-क्रीडांगणांवर जाता येणार आहे. मॉल्सही उघडले जातील. यातून साऱ्यांची सोय होईल खरी, पण काळजी घ्यावी लागणार आहे. फिजिकल डिस्टन्सिंगकडे कानाडोळा न होऊ देता वावर ठेवावा लागेल. सध्या तसे होताना दिसत नाही हेच चिंताजनक आहे. यातही ज्येष्ठ व लहान मुलांना अत्यावश्यक कामाखेरीज घराबाहेर न पाठवण्याचीच भूमिका घेणे हितावह ठरणार आहे. झालेय सुरू म्हणून, अख्खे कुटुंबच निघालेय बाजारात खरेदीला, हे टाळावे लागेल. मंगलकार्याप्रसंगी चुलीला निमंत्रण देण्यासारखे प्रकार व व्यक्तिगत सुख-दु:खाचे सार्वजनिकीकरण यापुढे थांबवावे लागेल. आजवरच्या सवयी बदलून नवीन जीवनपद्धतीचा अंगीकार करावा लागेल. त्यासाठी ‘स्वनियमन’ हाच खात्रीचा पर्याय व उपाय आहे. ‘कोरोना’ने तोच धडा घालून दिला आहे सर्वांना.