घरपट्टी थकबाकीदारांविरुद्ध जप्तीच्या कारवाईस सुरुवात
By admin | Published: November 18, 2016 12:22 AM2016-11-18T00:22:16+5:302016-11-18T00:22:10+5:30
महापालिका : २२ थकबाकीदारांना दिले वॉरंट
नाशिक : हजार-पाचशेच्या नोटाबंदीमुळे एकीकडे महापालिकेची घरपट्टी व पाणीपट्टीची कोट्यवधी रुपयांची वसुली होत असतानाच दुसरीकडे थकबाकीदारांना वॉरंट बजावत जप्तीची कारवाईही सुरू केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या खजिन्यात येत्या २४ नोव्हेंबरपर्यंत हजार-पाचशेच्या नोटांच्या माध्यमातून आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
महापालिकेला करवसुलीसाठी हजार-पाचशेच्या नोटा स्वीकारण्याची परवानगी मिळाल्यानंतर दि. १० नोव्हेंबरपासून शहरातील सर्व बिलिंग सेंटरवर वसुली सुरू करण्यात आली. दि. १० ते १४ नोव्हेंबर या कालावधीत महापालिकेची ९ कोटी १४ लाख रुपये घरपट्टी, तर १ कोटी ९६ लाख रुपये पाणीपट्टी वसूल झाली. त्यानंतर शासनाने करवसुलीसाठी २४ नोव्हेंबरपर्यंत आणखी मुदतवाढ दिल्याने पाचशे-हजारच्या नोटांच्या माध्यमातून करभरणा सुरूच आहे. त्यात मोठ्या प्रमाणावर थकबाकीदारांचाही समावेश आहे. दि. १५ रोजी घरपट्टी ५८ लाख ३६ हजार तर पाणीपट्टी १६ लाख १७ हजार, दि. १६ रोजी घरपट्टी ६२ लाख ३९ हजार, तर पाणीपट्टी १७ लाख ५७ हजार आणि दि. १७ रोजी घरपट्टी ५२ लाख ५९ हजार, तर पाणीपट्टी १७ लाख ३ हजार रुपये वसुली झाली आहे. दि. १५ ते १७ या तीन दिवसांच्या कालावधीत मनपाच्या खजिन्यात घरपट्टी व पाणीपट्टी मिळून सव्वादोन कोटी रुपये जमा झाले आहेत. दि. २४ नोव्हेंबरपर्यंत पाचशे-हजारच्या नोटा स्वीकारल्या जात असल्याने या काळात जास्तीत जास्त थकबाकी वसूल व्हावी यासाठी महापालिकेने थकबाकीदारांवर जप्तीच्या कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या दोन दिवसात महापालिकेने २२ थकबाकीदारांना जप्तीचे वॉरंट बजावले आहे. मनपाच्या या जप्तीच्या कारवाईच्या भीतीने थकबाकीदारांकडून रक्कम जमा केली जाणाच्या शक्यता आहे. (प्रतिनिधी)