जैन समाजाच्या वतीने अक्षय तृतीया महोत्सव, आत्मध्यान साधना शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2019 12:28 AM2019-05-01T00:28:56+5:302019-05-01T00:29:14+5:30
भगवान महावीरांच्या तत्त्वांना अनुसरून आत्म-कल्याणासाठी धर्मप्रसार करणारे श्रमणसंघाचे आचार्य, आत्मज्ञानी, ध्यानयोगी, युगप्रधान पू. डॉ. शिवमुनीजी महाराज, युवाचार्य पू. महेंद्रऋषीजी महाराज, प्रवर्तक पू. प्रकाशमुनीजी महाराज या सर्व व इतर ६० ते ७० जैन साधू-साध्वी यांच्या उपस्थितीत, ‘अक्षय तृतीया वर्षीतप पारणा महोत्सव’ सरस्वती विद्या केंद्र, तवळीफाटा, पेठरोड नाशिक येथे होत आहे.
नाशिक : भगवान महावीरांच्या तत्त्वांना अनुसरून आत्म-कल्याणासाठी धर्मप्रसार करणारे श्रमणसंघाचे आचार्य, आत्मज्ञानी, ध्यानयोगी, युगप्रधान पू. डॉ. शिवमुनीजी महाराज, युवाचार्य पू. महेंद्रऋषीजी महाराज, प्रवर्तक पू. प्रकाशमुनीजी महाराज या सर्व व इतर ६० ते ७० जैन साधू-साध्वी यांच्या उपस्थितीत, ‘अक्षय तृतीया वर्षीतप पारणा महोत्सव’ सरस्वती विद्या केंद्र, तवळीफाटा, पेठरोड नाशिक येथे होत आहे.
यानिमित्ताने ३ मे रोजी त्र्यंबकेश्वर येथील श्री श्री चंद्रेश लॉन्स येथे गुरुमहाराजांचे शुभआगमन होत आहे. श्री आॅल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स दिल्ली व नाशिक जिल्हा सकल जैन श्रीसंघ यांच्यातर्फे दि. ३ मे २०१९ रोजी सकाळी १० ते १ यावेळात त्र्यंबकेश्वर येथे स्वागत समारंभाचे आयोजन केले आहे.
आचार्य पू. डॉ. शिवमुनीजी महाराज सुमारे २५ वर्षांनंतर महाराष्ट्रात नाशिकमध्ये येत असल्यामुळे जैन समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ते जैन श्रमण संघाचे नेतृत्व गेले १५ वर्षांपासून करीत आहे.
दि. ३ मे रोजी त्र्यंबकेश्वर येथे प्रवेश झाल्यानंतर दि. ४ मे रोजी विल्होळी, दि. ५ मे रोजी रविवार कारंजा अशा क्रमाने दि. ६ मे २०१९ रोजी सरस्वती विद्या केंद्र तवळी फाटा, पेठरोड, नाशिक येथे शुभ आगमन होणार आहे.
दि. ७ मे २०१९ रोजी अक्षय तृतीया साडेतीन शुभ मुहूर्तातील एक शुभमुहूर्त आहे. या दिवशी सरस्वती विद्या केंद्र, तवली फाटा, नाशिक येथे संपूर्ण भारतातून साधारण ४०० वर्षातपाची आराधना करणारे जैन बंधू-भगिनी उपवासाची सांगता (पारणा) करण्यासाठी येणार आहेत.
कार्यक्रमाचे आयोजन श्री आॅल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स, नवी दिल्ली व नाशिक जिल्हा सकल जैन श्री संघ यांनी केले आहे.