किसान सभेच्या वतीने २१ डिसेंबरला चलो दिल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 01:20 AM2020-12-19T01:20:28+5:302020-12-19T01:22:54+5:30
दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने मोर्चाला पाठिंबा दर्शविण्यासाठी २१ डिसेंबरला नाशिकमधून भव्य वाहन मोर्चा दिल्लीकडे कूच करणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी हजारोंच्या संख्येने या मोर्चात सहभागी होणार असून पुढील गावांमधील शेतकरी तसेच अन्य राज्यांतील शेतकरीदेखील त्यात सहभागी होणार असल्याचे सभेचे अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. .
दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने मोर्चाला पाठिंबा दर्शविण्यासाठी २१ डिसेंबरला नाशिकमधून भव्य वाहन मोर्चा दिल्लीकडे कूच करणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी हजारोंच्या संख्येने या मोर्चात सहभागी होणार असून पुढील गावांमधील शेतकरी तसेच अन्य राज्यांतील शेतकरीदेखील त्यात सहभागी होणार असल्याचे सभेचे अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. . शेकडो वाहनांमधून हजारो शेतकरी २४ डिसेंबर रोजी दिल्ली येथील बॉर्डरवर पोहोचतील. नाशिकमधून हा वाहनजथ्था सर्व शेतकऱ्यांना घेऊन चांदवड, देवळा, मालेगावमार्गे शिरपूरला पोहोचणार असून तिथून मध्यप्रदेशात प्रवेश करणार आहे. या मार्गातील अन्य राज्यांतील शेतकरीदेखील या मोर्चात सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा आपले रेशन, पाणी, स्वयंपाक व निवासाची व्यवस्था सोबत घेऊन बेमुदत मुक्कामाच्या तयारीने दिल्लीला जातील, असेही डॉ. ढवळे यांनी सांगितले. माजी राज्य अध्यक्ष व माजी आमदार जे. पी. गावित यांनी वाहन जत्थासह हजारोंच्या संख्येने दिल्ली गाठणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार असून आदिवासींच्या लँग मार्चप्रमाणेच हा मोर्चा यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या या लढाऊ कृतीनंतर इतर राज्यातील शेतकरीही वाहन जथ्थे काढत दिल्लीच्या दिशेने कूच करतील असेही गावित यांनी नमूद केले. महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यांमधील शेतकरी नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथे २१ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता जमतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दुपारी १ वाजता दिल्लीच्या दिशेने निघतील. मोदी सरकार कॉर्पोरेट कंपन्यांच्या फायद्यासाठी कृषी कायदे आणत असल्याने ही लढाई केंद्र सरकार व त्यांचे कॉर्पोरेट भागीदार यांच्या विरोधात असल्याने वाहन जथ्था दिल्लीला प्रस्थान करेल, असेही त्यांनी नमूद केले. २२ डिसेंबरला दुपारी वाहन जथ्था धुळे येथे पोहोचल्यावर राज्यभरातील सर्व समविचारी शेतकरी, कामगार व श्रमिक संघटनांच्या वतीने धुळे येथे पाठिंबा सभा घेण्यात येईल. तसेच ओझर, पिंपळगाव बसवंत, चांदवड, उमराणे, मालेगाव आणि शिरपूर येथेही जनतेच्या वतीने जथ्थ्याचे जंगी स्वागत केले जाईल, असे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी सांगितले. या किसानांना साथ देण्यासाठी तसेच कामगारविरोधी कायद्यांचा निषेध करण्यासाठी सीटूचे कामगारदेखील मोर्चात सहभागी होणार असल्याचे सीटूचे राज्य अध्यक्ष डॉ. डी.एल. कराड यांनी सांगितले. यावेळी राज्य अध्यक्ष किसन गुजर, राज्य सहसचिव सुनील मालुसरे, इरफान शेख आदी उपस्थित होते. इन्फो दीडपट आधारभावाचे संरक्षण हवे केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावेत, शेतकरी विरोधी प्रस्तावित वीज बिल विधेयक मागे घ्यावे व शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट आधार भावाचे संरक्षण मिळावे यासाठी केंद्रीय कायदा करावा अशी मागणी किसान सभा करत असल्याचे सांगण्यात आले.