पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सातपूरला जागर स्त्रीशक्तीचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:23 AM2018-10-24T00:23:32+5:302018-10-24T00:23:59+5:30
सातपूर : आदिशक्तीने महिषासुराचा वध केल्याने विजयोत्सव म्हणून दसरा सण साजरा केला जातो. त्याचप्रमाणे समाजातील अपप्रवृत्तींचा, दुर्जनांचा विनाश करण्यासाठी ...
सातपूर : आदिशक्तीने महिषासुराचा वध केल्याने विजयोत्सव म्हणून दसरा सण साजरा केला जातो. त्याचप्रमाणे समाजातील अपप्रवृत्तींचा, दुर्जनांचा विनाश करण्यासाठी स्त्रियांनी आपल्यात दडलेल्या आदिशक्तीला पुढे आणणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अभिनेत्री विद्या करंजीकर यांनी केले आहे.
पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सातपूर येथील सौभाग्य लॉन्स येथे आयोजित जागर स्त्रीशक्तीचा या कार्यक्र मप्रसंगी ते बोलत होते. करंजीकर यांना आलेल्या स्त्रीविषयक चांगले-वाईट अनुभव विशद केले. अॅड. विद्या निकम यांनी महिलांविषयक कायदे व त्याची माहिती उपस्थित महिलांना दिली. कौटुंबिक वादाच्या सर्वात जास्त घटना पुणे व नागपूर शहरात घडत असून, हुंडाबळी यांसारख्या घटना अधिक असल्याचे सांगितले. यावेळी महिलांनी मीच दुर्गा व मीच आदिशक्ती असल्याची भूमिका मांडावी, असे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते, नन्ही कली समन्वयिका ज्योती वाघचौरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे आदी उपस्थित होते. स्वागत सहायक पोलीस आयुक्त नखाते यांनी केले. यावेळी नगरसेविका माधुरी बोलकर, पल्लवी पाटील, सीमा निगळ, हेमलता कांडेकर, फरिदा शेख यांच्यासह परिसरातील शेकडो महिला उपस्थित होत्या. प्रास्ताविक सहायक पोलीस निरीक्षक भावना महाजन यांनी केले. पोलीस उपनिरीक्षक सरिता जाधव यांनी आभार मानले.
महिलांनी सोशल मीडियाचा वापर जपून करावा
सध्या समाजात सायबर गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. समाजातील काही विकृत समाजकंटक महिलांचे फोटो डाउनलोड करत त्यावर छेडछाड करून कॉलगर्लसारख्या वेबसाईटवर फोटो अपलोड करण्याचे प्रकार पुढे येत आहे. त्यामुळे महिलांनी सोशल मीडियाचा वापर करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांनी केले.