शासन धोरणामुळे बळीराजा चिंंतित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 12:36 AM2017-08-24T00:36:06+5:302017-08-24T00:36:11+5:30
दत्ता दिघोळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नायगाव : शासनाने कांदा निर्यातशुल्क वाढीबरोबर आयातीचे धोरण अवलंबण्याचे संकेत दिल्याने आठवडाभरात वाढलेल्या कांदा भावाची झपाट्याने घसरण सुरू झाल्याने बळीराजाच्या आनंदावर विरजण पडले आहे. गेल्या अनेक दिवसांच्या कालावधीनंतर शेतकºयांच्या कांद्याला योग्य भाव मिळू लागल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत होते. उत्पादन खर्च वजा जाता चार पैसे शेतकºयांच्या पदारात पडण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी कुटुंबात समाधान व्यक्त होऊ लागले होते. असे असतांना ग्राहकांच्या भल्यासाठी व शहरी ग्राहकांची मर्जी राखत विकत घेणारे महत्त्वाचे मानून केंद्र शासनाने लगेच निर्यातीवर मूल्य लावण्याचे व कांदा आयातीचे संकेत दिल्याने व्यापारी वर्गाने लागलीच कांदा घसरणीस सुरूवात केल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे. गेल्या आठवड्यात क्विंटल मागे सुमारे ४०० ते ५०० रुपयांनी भाव कमी झाल्यामुळे बळीराजा नाराज झाला आहे. शेतकºयांच्या कोणत्याही मालास योग्य बाजारभाव मिळण्याची वेळ आली की शहरी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी येते. अशी परिस्थिती कायमचीच आहे.
शेतकºयांच्या जखमेवर मीठ
सध्या बाजारात विक्र ीस येत असलेला कांदा उत्पादक शेतकºयांनी गेल्या तीन-चार महिन्यांपासून साठविलेला आहे. सध्या देशांतर्गतच कांद्याला मोठी मागणी व कांदा साठा अल्प प्रमाणात असताना इजिप्त देशातून कांदा आयात करण्याचे केंद्र शासनाचे संकेत शेतकºयांना आर्थिक संकटात पाडणारे आहे. शेतीपिकांना हमीभाव न देणाºया शासनाने बळीराजाच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार करू नये, अशी अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे.
शेजारच्या राज्यांमध्ये कांदा उत्पादन घटल्याने महाराष्ट्रातील कांद्याला मागणी वाढल्यामुळे सध्या कांद्यास योग्य बाजारभाव मिळत आहे; मात्र कृषिप्रधान देशातच फक्त शेतकºयांना स्वत:च्या मालाचे दर स्वत:ला ठरविता येत नाही. कष्ट करून शेतात पिकविलेल्या मालाला योग्य बाजारभावाअभावी शेतकरी कुटुंब दिवसेंदिवस कर्जाच्या ओझ्याखाली दबत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.