कारवाईच्या आश्वासनानंतर उपोषण मागे
By Admin | Published: January 28, 2017 01:06 AM2017-01-28T01:06:30+5:302017-01-28T01:06:43+5:30
जिल्हा परिषद : सोमपूर ग्रामपंचायत अपहार प्रकरण; सरपंच, ग्रामसेवकांवर आरोप
नाशिक : सोमपूर (बागलाण) ग्रामपंचायतीअंतर्गत झालेल्या गैरव्यवहारांची चौकशी होऊन त्यात दोषी ठरविण्यात आलेले सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह सर्व दोषींवर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ गुरुवारी (दि.२६) जिल्हा परिषदेसमोेर सोमपूर ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व जिल्हा परिषद सदस्य डॉ. प्रशांत सोनवणे यांनी उपोषण केले.
यासंदर्भात निवेदन यापूर्वीच विभागीय आयुक्त, जिल्हा परिषद व बागलाण गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. निवेदनात नमूद करण्यात आले होते की, उपलब्ध कागदपत्रांच्या व चौकशी अहवालाच्या निष्कर्षावरून बॅँकेच्या खात्यावरून १७ लाख १५ हजार रुपयांचा नियमबाह्ण खर्च करून अपहार झाल्याचा निष्कर्ष नोंदविलेला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकऱ्यांनी त्वरित कार्यवाही करून अपहार करण्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करणे आवश्यक होते. यासंदर्भात सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्य डॉ. प्रशांत सोनवणे यांनी प्रश्न उपस्थित केल्यावर दोषींवर तत्काळ कारवाई करण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले होते. प्रत्यक्षात १२ जानेवारी २०१७ पर्यंत काहीही कार्यवाही केलेली नाही. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८च्या कलम ५७ अन्वये प्राप्त होणारा ग्रामनिधी व कलम ५८ तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११नुसार ग्रामपंचायतीस प्राप्त झालेल्या निधीचा खर्च कसा करावा, याबाबत तरतुदी आहेत. परंतु सोमपूर ग्रामपंचायतीच्या कामकाजाची चौकशी अहवालाचे अवलोकन केले असता संबंधित कलमांचे उल्लंघन ग्रामपंचायतीने केल्याचे आढळून आले आहे. तसेच मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८च्या कलम ४५ नुसार कर्तव्यात कसूरदेखील केल्याचे स्पष्टपणे चौकशी अहवालाचे अवलोकन केल्यावर निदर्शनास
येते.
त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतीच्या निधी गैरव्यवहारात दोषी आढळलेल्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषद सदस्य डॉ. प्रशांत सोनवणे यांच्यासह सोमपूर ग्रामपंचायतीचे सदस्य उषा भामरे, संगीता नहिरे, क्रांती भामरे, निर्मला सोनवणे, निंबा पिंपळसे तसेच ग्रामस्थांनी निवेदनानुसार गुरुवारी (दि. २६) जानेवारीला जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले होते. (प्रतिनिधी)