जोगलटेंभीत भ्रमणध्वनी बनले ‘शोभेची वस्तू’
By admin | Published: September 16, 2016 10:35 PM2016-09-16T22:35:04+5:302016-09-16T22:35:15+5:30
जोगलटेंभीत भ्रमणध्वनी बनले ‘शोभेची वस्तू’
नायगाव : सिन्नर तालुक्याच्या
उत्तर भागातील जोगलटेंभी परिसरातील भारत संचार निगमचे भ्रमणध्वनी शोभेची वस्तू बनले
असून, वापरासाठी नागरिकांना गावाबाहेर पायपीट करावी लागत आहे.
दिवसेंदिवस वाढती स्पर्धा असल्याने ग्राहकांना आपलेसे करण्यासाठी जास्तीत जास्त सेवा देण्याची विविध कंपन्यांची लगीनघाई सुरू आहे. असे असताना जोगलटेंभी गाव मात्र या सेवांपासून दोन हात दूरच आहे. गावात ५० ते ६० भारत संचार निगमचे ग्राहक आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून भ्रमणध्वनी गावात येताच नॉट रिचेबल होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गावातील सर्वच बीएसएनएलचे सर्व ग्राहकांचे भ्रमणध्वनी वापराविना पडून
आहेत.
सध्याच्या व्हॉट्सअॅप, फेसबुक, मेलच्या जमान्यात ग्राहकांना सेवा पुरविण्यात भारत संचार निगम जोगलटेंभी परिसरात कमी पडत असल्याचे बोलले जात आहे. महागडे मोबाइल घेऊनही त्याचा वापर करण्यासाठी थेट गावाबाहेर जावे लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
सदर असुविधेबाबत बीएसएनएलच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे.
तथापि, तरीही त्यात सुधारणा न झाल्यास बीएसएनएलचा वापर बंद करून खासगी कंपन्यांची सेवा घेण्याचा इशारा सार्वजनिक वाचनालयाचे दिलीप तांबे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष विलास गाडेकर, गोदा युनियनचे संचालक बाबाजी पाटील, धनलक्ष्मी पतसंस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर जेजूरकर, माजी सरपंच दत्तात्रय तांबे यांनी दिला आहे. (वार्ताहर)