कट्टर विरोधक आघाडीत असल्याने बंड होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:50 AM2019-05-25T00:50:08+5:302019-05-25T00:50:24+5:30
धुळे लोकसभेचा निकाल लागून मतदारांनी भाजपचे उमेदवार केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या पारड्यात मतदान करून पुन्हा एकदा त्यांना लोकसभेत काम करण्याची संधी दिली आहे.
धुळे लोकसभेचा निकाल लागून मतदारांनी भाजपचे उमेदवार केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या पारड्यात मतदान करून पुन्हा एकदा त्यांना लोकसभेत काम करण्याची संधी दिली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असले तरी मालेगाव मध्य मतदारसंघात लोकसभा निवडणुकीचा फारसा परिणाम होणार नाही, अशी स्थिती आहे.
मालेगाव मध्य मतदारसंघ हा कायम कॉँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. माजी मंत्री जनता दलाचे समाजवादी नेते दिवंगत निहाल अहमद यांना पराभूत करून आमदार रशीद शेख यांनी कॉँग्रेसचा झेंडा नेहमीच या मतदारसंघात फडकवत ठेवला आहे. अपवाद फक्त गेल्या २००९ मधील निवडणुकीचा ठरला. माजी आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी २००९ मध्ये विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाकडून उमेदवारी करीत कॉँग्रेस आमदार रशीद शेख यांचा पराभव केला होता; मात्र माजी आमदार विद्यमान महापौर रशीद शेख यांचे पुत्र आसिफ शेख यांनी २०१४ मध्ये राष्टÑवादी कॉँग्रेसकडून उमेदवारी करणाऱ्या मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांचा पराभव करीत रशीद शेख यांच्या २००९ मध्ये झालेल्या पराभवाची परतफेड केली होती. विधानसभा निवडणूक येत्या दोन महिन्यावर येऊन ठेपली आहे. शिवसेना आणि भाजपची युती असूनही या मतदारसंघात त्यांचा पारंपरिक मतदार नाही. लोकसभा निवडणूक निकालाचा फारसा प्रभाव मालेगाव मध्य मतदारसंघात शक्य नाही. कारण हा मतदारसंघ मुस्लीमबहुल मतदारांचा आहे. या मतदारसंघात कॉँग्रेस विरोधातच पारंपरिक विरोधकांमध्ये लढतीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यात कॉँग्रेस विरोधात माजी आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांच्यातच लढतीची शक्यता आहे. मात्र कॉँग्रेस आणि राष्टवादी कॉँग्रेस यांच्यात आघाडी असल्याने मौलाना कोणता निर्णय घेतात यावर पुढील लढतीचे गणित अवलंबून आहे.
मालेगाव मध्य मतदारसंघ कायमच कॉँग्रेससोबत
लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला पुन्हा दुसऱ्यांदा संधी मिळाली असली तरी त्याचा मालेगाव मध्य मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीवर फारसा परिणाम होणार नाही. कारण मालेगाव मध्य मतदारसंघात बहुसंख्य मुस्लीम मतदार असून, हा मतदार जनता दलाचा काही काळ वगळता नेहमी कॉँग्रेस बरोबर राहिला आहे. विधानसभेसाठी विद्यमान आमदार आसिफ शेख आणि माजी आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल या परंपरागत राजकीय विरोधकातच लढत होण्याची शक्यता असून, माजी महापौर मलिक इसा आणि निहाल अहमद यांचे पुत्र बुलंद एकबाल यांची भूमिका लक्ष्यवेधी ठरणार आहे. काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेस यांच्यात युती असल्याने विद्यमान आमदार आसिफ शेख यांच्या विरोधात एमआयएम (वंचित आघाडी) कुणाला उमेदवारी देते यावर पुढील गणिते अवलंबून आहेत. कारण काँग्रेस - राष्टÑवादी कॉँग्रेस यांच्यात आघाडी असल्याने मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल बंडखोरी करून अपक्ष किंवा वंचित आघाडीतर्फे लढण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.