दिंडोरी तालुक्यात २२ शाळांची घंटा वाजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:12 AM2021-07-16T04:12:19+5:302021-07-16T04:12:19+5:30
स्थानिक शालेय समिती, ग्रामपंचायत व पालक यांच्या संमतीनुसार ज्या गावात कोविड रुग्ण नाहीत, तिथे शासनाने शाळा सुरू करण्याचे ...
स्थानिक शालेय समिती, ग्रामपंचायत व पालक यांच्या संमतीनुसार ज्या गावात कोविड रुग्ण नाहीत, तिथे शासनाने शाळा सुरू करण्याचे जाहीर केले होते. मात्र, जिल्हा पातळीवरून स्पष्ट आदेश न आल्याने तालुक्यात संभ्रमावस्था कायम राहिल्याने काही शाळांची घंटा वाजली नसली तरी एक दोन दिवसात शासनाने दिलेल्या मार्गदर्शन सुचनेनुसार समाविष्ट होणाऱ्या शाळा सुरू होणार आहेत. गुरुवारी अनेक शाळांमध्ये स्वयंस्फूर्तीने विद्यार्थी हजर झाले. पालक स्वतः पाल्यांना घेऊन शाळेत आले होते. विविध शाळांनी वर्ग सुरू करण्याची तयारी करत शाळेचे वर्ग निर्जंतुकीकरण केले असून, सॅनिटायझर, हात धुण्यासाठी पाणी, साबण आदी व्यवस्था केली आहे. तसेच ५० टक्के क्षमतेने विद्यार्थी हजेरीचे नियोजन केले आहे. तालुक्यात ८वी ते १०वी वर्ग असलेले जिल्हा परिषदेच्या १६, स्वयंअर्थसहाय्यीत ४, खासगी विनाअनुदानित ५, शासकीय आश्रमशाळा ९, खासगी अनुदानित ५२, अनुदानित आश्रमशाळा ३ अशा एकूण ७९ शाळा आहेत. त्यापैकी २२ शाळांचे वर्ग सुरू झाले असल्याची माहिती तालुका गटशिक्षणाधिकारी बी. डी. कनोज यांनी दिली आहे.