बेलूची सुप्रिया तुपे ‘कुमार महाराष्ट्र केसरी’ ची मानकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 05:48 PM2019-01-31T17:48:41+5:302019-01-31T17:53:31+5:30
नांदूरवैद्य : विविध राज्यस्तरीय व आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत चमकदार कामिगरी करत सिन्नर तालुक्यातील बेलू येथील सुप्रिया तुपे हिने आपली ...
नांदूरवैद्य : विविध राज्यस्तरीय व आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत चमकदार कामिगरी करत सिन्नर तालुक्यातील बेलू येथील सुप्रिया तुपे हिने आपली कुस्तीतील विजयी घोडदौड कायम ठेवत वर्धा येथे झालेल्या ४१ व्या महाराष्ट्र राज्य महिला कुमार गट केसरी राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा - २०१९ या स्पर्धेत प्रतिस्पर्ध्यावर मात करत ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाची मानकरी ठरली. जिल्हयाच्या कुस्ती इतिहासात सुप्रियाच्या रु पाने प्रथमच हा बहुमान नाशिकला मिळाला आहे.
दिनांक २८ ते ३० जानेवारी २०१९ दरम्यान वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे झालेल्या राज्यस्तरीय महिला कुमार गट केसरी स्पर्धेत आजपर्यंतच्या नाशिक जिल्ह्याच्या इतिहासात महाराष्ट्रात प्रथमच नाशिक जिल्ह्याला महिला कुमार गट केसरीचा बहुमान मिळवुन देणारी सिन्नर तालुक्यातील बेलू येथील व गुरु हनुमान आखाडा साकुर फाटा येथे आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू ज्ञानेश्वर शिंदे यांच्याकडून कुस्तीचे डावपेच शिकत असलेली सुप्रिया तुपे हिने नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत ६१ किलो वजनी गटामध्ये कोल्हापूर, अहमदनगर, अमरावती व पुणे या महिला कुस्तीपटुंचा पराभव करून नेत्रदिपक कामगिरी करत ‘कुमार महिला महाराष्ट्र केसरी’ हा किताब मिळविला आहे.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, कार्याध्यक्ष नामदेव मोहिते, उपाध्यक्ष नागनाथ देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते. सुप्रिया तुपे हि सध्या गुरु हनुमान आखाडा साकुरफाटा ता. इगतपुरी या केंद्रात कुस्तीचे प्रशिक्षण घेत असुन तिला केंद्राचे अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, व्यवस्थापक चांद्रयान शिंदे, कुंडलिक सारूक्ते, भरविरचे सरपंच दत्तु जुंद्रे, प्रशिक्षक प्रविण सुर्यवंशी, आप्पा धोंगडे, राष्ट्रीय चैंपियन कुस्तीपटू बाळु बोडके, संदिप गायकर, विष्णू धोंगडे, निवृत्ती धोंगडे, पांडुरंग जुंद्रे, बाळू जुंद्रे तसेच तिचे वडील माजी सैनिक बहिरू तुपे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. सुप्रियाच्या या यशस्वी व उल्लेखनीय कामगिरीमुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. शाळेचे कार्यवाह कैलास गायकवाड, प्राचार्य श्रीमती चड्डा, ताजवे, शिक्षक पाळदे यांनी तिचे कौतुक केले.