मनपाच्या मेनरोडवरील इमारतीला गोण्यांचा टेकू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 12:48 AM2019-07-31T00:48:39+5:302019-07-31T00:48:57+5:30
शहरात सुरू असलेल्या पावसामुळे आधीच जीर्ण होत चालेल्या महापालिकेच्या मेनरोड येथील कार्यालयाचा काही भाग कोसळल्यांनतर प्रशासनाने तातडीने तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी सुरू केली आहे. तूर्तास वाळूच्या गोण्या भरून इमारतीच्या धोकादायक भागाला टेकू देण्यात येणार असून, पावसाळ्यानंतर नूतनीकरणाचे काम केले जाणार आहे.
नाशिक : शहरात सुरू असलेल्या पावसामुळे आधीच जीर्ण होत चालेल्या महापालिकेच्या मेनरोड येथील कार्यालयाचा काही भाग कोसळल्यांनतर प्रशासनाने तातडीने तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी सुरू केली आहे. तूर्तास वाळूच्या गोण्या भरून इमारतीच्या धोकादायक भागाला टेकू देण्यात येणार असून, पावसाळ्यानंतर नूतनीकरणाचे काम केले जाणार आहे.
महापालिकेची मेनरोडवरील इमारत ब्रिटिशकालीन आहे. ती काळ्या दगडात घडविलेली आहे. भूतपूर्व नगरपालिकेचे ते मुख्यालय होते. महापालिकेची स्थापना झाल्यानंतरदेखील काहीकाळ या कार्यालयातून काम चालले त्यानंतर महापालिकेचे मुख्यालय जुनी पंडित कॉलनी आणि राजीव गांधी भवनात चालले असले तरी या इमारतीतदेखील काही विभाग कायम आहेत. शिक्षण मंडळाचे कार्यालयदेखील याच ठिकाणी होते. आता या इमारतीत अनेक ठिकाणी भेगा पडल्या असून, काही दगडे पडण्यास झाली आहेत. विशेषत: त्यावर झाडे उगवल्यानंतर दोन दगडांमधील अंतर वाढत गेले आणि दगडे पडण्याचा धोका अधिक वाढला आहे. सोमवारी (दि.२९) यातील काही दगडे पडल्याने पुन्हा इमारतीचा विषय चर्चेत आला असून, इमारतीचे स्थलांतर करण्यासाठी नगरसेवकांनी निवेदने दिली आहेत.
महापालिकेने इमारतीला तातडीने आधार देण्यासाठी पुरातत्व विभागाची मदत घेऊन तेथे काम करणाऱ्या तज्ज्ञ वास्तुविशारदांची मदत घेतली आहे. योगेश कासार यांनी त्यानुसार इमारतीची प्राथमिक तपासणी करून महापालिकेला अहवालदेखील दिला आहे. इमारतीच्या बाह्य भागातील काही दगडे पडले असले तरी मूळ गाभा सुस्थितीत आहे. तरीही सर्व इमारतींची तपासणी करून महापालिका स्ट्रक्चरल आॅडिट करणार आहे व तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार नूतनीकरणाचा निर्णय घेणार आहे. तूर्तास तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पडण्यास आलेल्या भागाला आधार देण्यासाठी गोण्या लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. प्रत्यक्ष इमारतीची शास्त्रोक्तपद्धतीने डागुडुजी आणि नूतनीकरणाचे काम पावसाळ्यानंतरच करण्यात येईल, अशी माहिती शहर अभियंता संजय घुगे यांनी दिली.
पूर्व कार्यालय पंडित कॉलनीत जाणार
ब्रिटिशकालीन इमारतीचा काही भाग धोकादायक असल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पंडित कॉलनीतील जुन्या मनपा इमारतीतच पूर्व विभागाच्या कार्यालयाचे स्थलांतर करण्याचा विचार प्रशासन करीत आहेत. सध्या याठिकाणी पश्चिम विभागीय कार्यालयदेखील आहे. या इमारतीतील शिक्षण मंडळाचे कार्यालय राजीव गांधी भवनात स्थलांतरित झाल्याने त्या जागेत पूर्व विभागाचे स्थलांतर करण्याचा प्रस्ताव आहे. मुळात द्वारका येथे मनपाच्या जागेत पूर्व विभागासाठी नूतन इमारत बांधण्याचा प्रस्ताव आहे. तो प्रलंबितअसल्याने सध्या मेनरोड येथील जुन्या इमारतीतूनच पूर्वविभागाचे कामकाज चालते.