लाभार्थींच्या याद्या तातडीने पाठवासभापतींचे आदेश
By Admin | Published: May 22, 2015 10:47 PM2015-05-22T22:47:28+5:302015-05-22T22:48:13+5:30
समाज कल्याण समिती बैठक
नाशिक : समाज कल्याण विभागा-मार्फत सन-२०१४-१५ वर्षातील वैयक्तिक लाभाच्या योजनांमधील लाभार्थींची तातडीने निवड करून त्यांची यादी जिल्हास्तरावर तत्काळ पाठविण्याचे आदेश समाज कल्याण सभापती उषा बच्छाव यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीची बैठक सभापती उषा बच्छाव यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीत आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर अर्थसहाय्य कामकाजाचा आढावा घेण्यात आला. शिल्लक धनादेश मंजूर प्रस्ताव धारकांना तत्काळ वाटप करण्याच्या सूचना सभापती बच्छाव यांनी दिल्या. सन- २०१५-१६ या वर्षातील मागासवर्गीयांना वैयक्तिक लाभाच्या योजनांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. वृद्ध कलाकार मानधन योजनेचा आढावा घेण्यात आला. फेब्रुवारी २०१५ अखेरपर्यंतचे शासनाकडून प्राप्त मानधन वाटप केलेले आहे. तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरीत केल्याबाबत समाज कल्याण उपायुक्त तथा समाज कल्याण अधिकारी वंदना कोचुरे यांनी माहिती दिली. सन-२०१४-१५ मधील साहित्य प्राप्त व वाटपाचा आढावा घेण्यात आला.
तसेच सन-२०१५-१६ करिता वैयक्तिक लाभार्थी यादी तातडीने सादर करण्याबाबत सर्व अतिरिक्त गटविकास अधिकाऱ्यांना सभापती उषा बच्छाव यांनी सूचना केल्या. सभेस सदस्य निर्मला गिते, स्वाती ठाकरे, इंदूबाई गवळी, साईनाथ मोरे, अर्जुन मेंगाळ, अनिता जाधव, संगीता काटे आदि उपस्थित होेते. (प्रतिनिधी)