पंचायत समिती कार्यालयावर घरकुल लाभार्थींचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 11:22 PM2020-02-07T23:22:45+5:302020-02-08T00:01:51+5:30
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तालुक्यातील लाभार्थींना घराचे पूर्ण बांधकाम करूनही घरकुलाचा तिसरा व चौथा हप्ता अद्यापही मिळाला नसल्याच्या कारणाने येथील पंचायत समिती कार्यालयावर भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.
सुरगाणा : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तालुक्यातील लाभार्थींना घराचे पूर्ण बांधकाम करूनही घरकुलाचा तिसरा व चौथा हप्ता अद्यापही मिळाला नसल्याच्या कारणाने येथील पंचायत समिती कार्यालयावर भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.
मोर्चानंतर झालेल्या सभेत उपसभापती इंद्रजित गावित, पेठ येथील डीवायएफआयचे तालुकाध्यक्ष महेश टोपले, पालघर येथील पं. स. सदस्य नंदू हाडळ, सुभाष भोये, पांडुरंग गायकवाड, भारती चौधरी, तुळशीराम खोटरे, मोनिका पवार, देवीदास हाडळ, एसएफआयचे राज्य कमिटी अध्यक्ष अजय टोपले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभार्थींच्या मागणीबाबतचे निवेदन घरकुल योजनेचे सहायक प्रकल्प अधिकारी डॉ. संजय माळी यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण घरकुल ब यादीतील ३९७४ लाभार्थींना शासनामार्फत पहिला व दुसरा हप्ता मिळाला आहे, मात्र तिसरा व चौथा हप्ता लाभार्थीने घराचे बांधकाम पूर्ण करूनही मिळालेला नाही. परिणामी गरीब आदिवासी लाभार्थींची मोठी हेळसांड होत आहे. तिसरा व चौथा हप्ता मिळेल या भरवशावर उसनवारी करून घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले आहे. हप्ता तर मिळालाच नाही मात्र ज्यांच्याकडून उसनवारी केली ते पैसे मागत असल्याने लाभार्थी मेटाकुटीला आला आहे. राज्य व केंद्र सरकारच्या परस्परविरोधी राजकारणाचा बळी गरीब आदिवासी लाभार्थी पडू नये यासाठी या मोर्चाचे आयोजन डीवायएफआय संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी रोजगार हमी योजनेचे दोन वर्षांपासून पैसे मिळाले नसल्याचे तसेच विहिर प्रकरण व घरकुल हफ्त्यासाठी लाभार्थी कडून पैसे घेत असल्याची तक्र ार करण्यात आली. यापुढे असे घडल्यास तक्रार करण्याचे व संबंधितावर कारवाई करण्याचे आश्वासन सहायक प्रकल्प अधिकारी डॉ. संजय माळी व गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी दिले.
आश्वासनानंतर उपोषण मागे
गुरुवारपासून (दि.६) यासंदर्भात पंचायत समितीसमोर उपोषण सुरू करण्यात आले होते. मात्र, शासनाचे आदेश प्राप्त होताच पुढील कार्यवाही तालुकास्तरावरून तत्काळ करण्याचे लेखी आश्वासन पंचायत समितीकडून देण्यात आल्याने उपोषणास बसलेले सुभाष भोये, पांडुरंग गायकवाड, राहुल अहेर, मेनका पवार, भारती चौधरी, नितीन गावित, तुळशीराम खोटरे, देवीदास हाडळ, योगेश जाधव, कृष्णा भोये, लक्ष्मण कनोजे, राहुल गावित, कान्हा हिरे, नितीन पवार यांनी उपोषण मागे घेतले.