‘सावाना’मुळे लाभला अनेक दिग्गजांचा सहवास
By Admin | Published: April 12, 2017 01:54 AM2017-04-12T01:54:48+5:302017-04-12T01:55:19+5:30
नरेश महाजन : जुन्या कार्यकारिणीच्या निरोप समारंभात व्यक्त केल्या भावना
नाशिक : सार्वजनिक वाचनालय नाशिक या संस्थेमुळे आयुष्यात आपल्याला अनेक सुवर्णक्षण बघायला मिळाले. वाचनालयामुळे अनेक दिग्गजांचा सहवास लाभला, हीच खरी संपत्ती आहे, अशी भावना सार्वजनिक वाचनालयाचे मावळते उपाध्यक्ष नरेश महाजन यांनी जुन्या कार्यकारिणीला निरोप आणि नवीन कार्यकारिणीचे स्वागत करण्यासाठी मंगळवारी (दि. ११) आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमात व्यक्त केली.
सार्वजनिक वाचनालयाच्या मिटिंग हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जुन्या आठवणींना उजाळा देताना महाजन यांनी, वयाच्या २२ व्या वर्षापासून वाचनालयाची अखंड सेवा करायला मिळाली, वाचनालयाचा पहिला साहित्यिक मेळावा ते पन्नासावा साहित्यिक मेळाव्याचा भाग होता आल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी उपस्थित नूतन कार्यकारिणीचे स्वागत करताना महाजन यांनी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करा, भांडण करा, न्यायालयात जा पण चांगली कामे करा, असे आवर्जून सांगितले. शहरातील नागरिक आणि वाचकांशी प्रतारणा न करण्याचे आवाहन केले. यंदाच्या निवडणुकीत नवीन आणि अनुभवी उमेदवार निवडून आल्याने वाचनालयाला निश्चितच फायदा होणार असल्याचे नरेश महाजन यांनी सांगितले.
वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांनी आपल्या मनोगतातून समाजात वाचनालयाची बिघडलेली प्रतिमा खोडून काढण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील, असे सांगताना आपल्या मनात कुणाबद्दलही राग नसून नवीन जबाबदारी चोखपणे पार पाडणार असल्याचे सांगितले.
निवडणूक संपली असून आता नव्याने काम सुरू करायचे आहे, राष्ट्रीय पातळीवर सार्वजनिक वाचनालयाचे नाव होण्याच्या दृष्टीनेदेखील प्रयत्न करणार असल्याचे तसेच नाशिकमधील इतर वाचनालय सावानाशी जोडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे औरंगाबादकर यांनी यावेळी सांगितले.
या छोटेखानी बैठकीदरम्यान नूतन कार्यकारिणीतील सर्वच्या सर्व अठरा सभासदांसह जुन्या कार्यकारिणीतील नरेश महाजन आणि सरल धारणकर उपस्थित होते. तसेच देणगीदार प्रतिनिधी विनायक नेर्लीकर आणि वाचनालयाचे अंतर्गत लेखा परीक्षक सी. जे. गुजराथी आदि उपस्थित होते. दरम्यान, आज बुधवारी (दि. १२) संध्याकाळी ६.३० वाजता नवीन कार्यकारिणी पदभार स्वीकारणार असून पदांचेदेखील वाटप केले जाणार आहे. (प्रतिनिधी)