बंगालच्या चक्रीवादळाने अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, 8 ते 10 राज्यांना वातावरण बदलाचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 06:07 PM2021-12-04T18:07:14+5:302021-12-04T18:10:05+5:30
नाशिक : वातावरण बदलाचा फटका देशभरातील आठ ते दहा राज्यांना सध्या तरी बसतो आहे. अचानकपणे या राज्यांमधील बहुतांश जिल्ह्यांचा ...
नाशिक : वातावरण बदलाचा फटका देशभरातील आठ ते दहा राज्यांना सध्या तरी बसतो आहे. अचानकपणे या राज्यांमधील बहुतांश जिल्ह्यांचा भाग बेमोसमी पावसाने प्रभावित झालेला पाहावयास मिळत आहे. पाच दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या महासागरात निर्माण झालेली चक्रवाताची स्थिती हळूहळू अरबी समुद्राकडे सरकत गेली आणि अरबी समुद्रातही चक्रीवादळाची स्थिती निर्माण होऊ लागल्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होत गेले. अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र सर्वसाधारणपणे चार दिवस स्थिर राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. अजून पुढील दोन दिवस तरी नाशकात वातावरणावर या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव पाहावयास मिळू शकतो. यामुळेच बेमोसमी पावसाला नाशिकसह कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा या जिल्ह्यांत सुरुवात झाली. बुधवारी मागील २४ तासांत शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील निफाड, लासलगाव, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला.
किमान तापमानाचा पारा १३.९ अंशापर्यंत खाली घसरला असला तरीदेखील पुढील दोन दिवसांत यामध्ये अजून १ अंशाने घसरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकीकडे थंडीचा हंगाम अन् दुसरीकडे बेमोसमी पावसाचा तडाखा यामुळे वातावरणात कमालीचा गारवा वाढल्याचा अनुभव सध्या नाशिककरांना येत आहे. तसेच हवेत बाष्पाचे प्रमाणही वाढल्याने वातावरणात मागील दोन ते तीन दिवसांपासून धुके अधिक पाहावयास मिळत आहे. त्यामुळे दृश्यमानतेची टक्केवारी काही प्रमाणात कमी झाल्याचे लक्षात येते. शुक्रवारीसुद्धा (दि.३) शहरात मळभ दाटलेले असेल आणि धुक्याच्या वातावरणाचा सामना करावा लागू शकतो. मागील दोन दिवसांत वाऱ्याचा वेगदेखील सौम्य झाल्याने शहरासह जिल्ह्यात जोरदार बेमोसमी पाऊस अधिक झाला. शनिवारी सकाळी नाशिककरांना सूर्यदर्शन घडण्याची शक्यता आहे. तसेच वाऱ्याचा वेगदेखील वाढू शकतो. त्यामुळे बेमोसमी पावसाचा धोका कमी होण्यास मदत होईल. शेतकरीवर्गाने विशेषत: द्राक्ष बागायतदारांसह अन्य फळबागा उत्पादकांनी अधिक काळजी घेत शेतपिकांवर अधिकाधिक आच्छादन टाकून शेक देण्याचा प्रयत्न करायला हवा, जेणेकरून लहरी निसर्गाच्या प्रभावामुळे शेतपिकांचे जास्तीत जास्त होणारे नुकसान टळण्यास मदत होईल.
पश्चिम बंगालच्या महासागरामध्ये पाच दिवसांपूर्वी निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा प्रभाव अरबी समुद्रातदेखील पाहावयास मिळत आहे. अरबी समुद्रात दोन दिवसांपासून कमी दाबाचे क्षेत्र विकसित होत गेल्याने मध्य, उत्तर, पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत बेमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली.
- सुनील काळभोर, हवामान केंद्र प्रमुख, नाशिक
-