शोकसभा : विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना भाई वैद्य यांच्याकडून मूल्याची जपणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 01:06 AM2018-04-07T01:06:59+5:302018-04-07T01:06:59+5:30
नाशिक : राष्टÑसेवा, समाजवाद अशी मूल्येच जगाला तारू शकतात. आपल्या कृतीतून, विचारांतून ती मूल्ये सातत्याने इतरांना देण्याचे काम भाई वैद्य यांनी केले.
नाशिक : राष्टÑसेवा, समाजवाद अशी मूल्येच जगाला तारू शकतात. आपल्या कृतीतून, विचारांतून ती मूल्ये सातत्याने इतरांना देण्याचे काम भाई वैद्य यांनी केले. ती मूल्ये आजच्या पिढीने स्वत:त रुजवून देशाला मारक गोष्टी दूर ठेवत आदर्श नागरिक म्हणून कायम वर्तन ठेवले तरच ती भाई वैद्य यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केल्या. शुक्रवारी (दि. ६) सायंकाळी हुतात्मा स्मारकामध्ये शोकसभा पार पडली. यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणामधून भार्इंच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. शांताराम चव्हाण म्हणाले, भार्इंचे राजकीय, सामाजिक जीवनातील योगदान महत्त्वाचे होते. ते लहानातल्या लहान कार्यकर्त्याची दखल घेत. माणसे जोडण्याचे त्यांचे कसब अफलातून असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी सांगितले की, शेवटच्या क्षणापर्यंत ते समाजात लढत राहिले. त्यांचे आयुष्य लढायांनी भरले होते. स्वातंत्र्य लढाई, गोवा स्वातंत्र्यलढा, मराठवाडा मुक्ती मोर्चा, आणीबाणी आदी अनेक लढाया ते लढले. या लढाया ते स्वत: नेते या नात्याने आणि कार्यकर्त्यांची फौज निर्माण करण्यासाठीही लढत होते. प्रत्येक पिढीशी ते मनापासून समरस होत. मनमोकळेपणा हा त्यांचा गुणधर्मच होता. महाराष्टÑाच्या हातात विचारांचे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचे हत्यार देण्याचे काम त्यांनी केले. भाई वैद्य यांनी ‘आमच्या काळात’ असा शब्द कधीच वापरला नाही. त्यांनी कायम विद्यमान, वर्तमान पिढीला भेडसावणारे प्रश्न मांडले. समाजातील सर्व प्रेरणास्थानांवर प्रेम करणारे भार्इंचे व्यक्तिमत्त्व दुर्मीळ असल्याचे कांबळे यांनी अधोरेखित केले. ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी सांगितले की, आणीबाणीच्या काळात महापौर असूनही भाई भूमिगत राहून लढा देत होते. त्या काळात ते ज्या-ज्या कार्यकर्त्याच्या घरात राहायचे, त्या-त्या घरातील सदस्यांचे ते प्रबोधन करत. भार्इंनी समाजवादी प्राध्यापक, शिक्षक संघटना काढली होती. त्यांना संगीताची आवड होती. जीवनातील सर्व कलांवर प्रेम करणारा हा माणूस अफलातून होता, अशा शब्दांत त्यांनी भार्इंच्या आठवणींना उजाळा दिला. सभेत राकेश पवार, राम गायटे आदी विविध मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी विविध क्षेत्रांतील नागरिक उपस्थित होते.