शोकसभा : वन अन् वन्यजीवांचे संवर्धन हीच ठरेल खरी श्रध्दांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 04:01 PM2018-12-09T16:01:09+5:302018-12-09T16:01:37+5:30
१९९७ ते २०१७ सालापर्यंत राज्य शासनाच्या वतीने नाशिकचे मानद वन्यजीव संरक्षकपद भुषविणारे तसेच नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राहा यांनी तब्बल वीस वर्षे पश्चिम घाट व नाशिक जिल्हा पिंजून काढला.
नाशिक : मुंबईवरून नाशिकमध्ये स्थायिक झाल्यानंतर उभे आयुष्य येथील नैसर्गिक जैवविविधतेच्या संवर्धनासाठी वेचणारे निसर्गदूत, पक्षी अभ्यासक मानद वन्यजीव संरक्षक बिश्वरूप राहा यांचे कार्य सगळ्यांनी एकत्र येत पुढे नेण्याची गरज आहे. वन आणि वन्यजीवांचे कृतिशील संवर्धन हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशी भावना अनेकांनी शोकसभेत व्यक्त केली.
गेल्या सोमवारी (दि.३)बिश्वरूप ब्रम्हव्रत राहा (६२) यांचे आजाराने निधन झाले. नाशिक वनविभागाच्या वतीने उंटवाडी येथील वनविभागाच्या सभागृहात शनिवारी (दि.८) शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. १९९७ ते २०१७ सालापर्यंत राज्य शासनाच्या वतीने नाशिकचे मानद वन्यजीव संरक्षकपद भुषविणारे तसेच नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राहा यांनी तब्बल वीस वर्षे पश्चिम घाट व नाशिक जिल्हा पिंजून काढला. येथील जैवविविधता समृध्द जरी असली तरी संवर्धन ही काळाची गरज ओळखून त्यांनी कृतीशील कार्य करण्यास सुरूवात केली. राहा यांनी लावलेल्या ‘एनसीएसएन’चे आजिवन सभासद मोठ्या संख्येने होऊन त्यांचे कार्य पुढे वाढविण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांनी केले.
ज्येष्ठ पक्षीमित्र दत्ता उगावकर यांनी शोकभावना व्यक्त करताना राहा यांचा १० लाख आदिवासी भागांमधील विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयीची जनजागृतीचा संकल्पाला उजाळा दिला. पक्षीमित्र सतीश गोगटे यांनी यंदाचा हिवाळ्याचा हंगाम सर्वच पक्षीमित्रांसाठी दु:खदायक असाच आहे. वन्यजीव छायाचित्रकार, पक्षी अभ्यासक, सामाजिक क ार्याने झपाटलेले प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व नाशिकच्या निसर्गमित्रांनी राहा यांच्या रुपाने गमावल्याची भावना व्यक्त केली. निसर्गाविषयीचा नवा दृष्टकोन देणारे राहा अंकल आज आपल्यात नाही, यावर विश्वास बसत नाही, अशी भावना अशोका समुहाचे संचालक आशिष कटारिया यांनी व्यक्त केली. गंगापूर धरणावरील ‘सी-प्लेन’ उपक्रम रोखण्यासाठी दिलेला यशस्वी लढा खूप काही शिकवून जातो, असेही कटारिया यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपवनसंरक्षक टी.ब्यूला एलील मती, डॉ. शिवाबाला एस., सहायक वनसंरक्षक राजन गायकवाड, स्वप्नील घुरे, विभागीय अधिकारी श्याम रनाळकर, ज्येष्ठ पक्षीमित्र दिगंबर गाडगीळ, वनपरिक्षेत्र अधिकारी रवींद्र भोगे, रविंद्र सोनार मृणाल घोसाळकर, प्रतीक्षा कोठुळे आदि पक्षीप्रेमी, निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.