सुप्रियातार्इंच्या शुभेच्छा या नाइलाजातून आलेल्या...
By किरण अग्रवाल | Published: September 1, 2019 01:20 AM2019-09-01T01:20:21+5:302019-09-01T01:28:12+5:30
भुजबळ राष्टवादी सोडणार की नाही, हाच सध्या ‘हॉट’ प्रश्न आहे. त्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या सर्वात्मक शुभेच्छा बोलक्या ठराव्यात; पण त्यामागील उभयतांची नाइलाजस्थिती व त्यातूनच ओढवलेली असहायताही लपून राहू नये. रामदास आठवले यांच्यासारखे नेतेही भुजबळांना रिपाइंत येण्याचे निमंत्रण देतात ते त्यामुळेच.
सारांश
स्वकीयांच्या पक्षांतराचे धक्क्यावर धक्के सहन करताना सदर पडझडीची स्थिती रोखण्याचा अगर त्यासाठी आश्वासकता निर्माण करण्याचा प्रयत्न न करता, जाणाऱ्यांना शुभेच्छाच दिल्या जातात तेव्हा त्यातून राजकीय उदारता तर प्रदर्शित होतेच होते; शिवाय असहायताही उघड होऊन गेल्याखेरीज राहात नाही. राष्टवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांच्या अलीकडील नाशिक दौ-यात त्याचेच प्रकर्षाने प्रत्यंतर येऊन गेले.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र ‘इन्कमिंग-आउटगोइंग’चे पेव फुटले आहे. यातही राष्टवादी कॉँग्रेसमध्ये सर्वाधिक ओहोटी होताना दिसत आहे. खरे तर राष्टवादी हा पक्ष आपापल्या परिसरात वैयक्तिक प्राबल्य राखणाºया नेत्यांचा पक्ष म्हणवतो. पक्ष व निशाणीपेक्षा स्वत:ची मातब्बरी असलेले हे नेते आहेत. त्यामुळे सुभेदार, कामदार, नामदारांचा हा पक्ष असल्याची टीका आजवर या पक्षावर होत आली, परंतु या टीका करणाºयांच्याच पक्षात आता हे सुभेदार व संबंधित मुजरा रुजू करू पाहात असल्याने राष्टवादीत उरेल कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांचा नुकताच नाशिक दौरा झाला व त्यात त्यांनी पक्ष सोडून जाणाºया सर्वांनाच शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छांमागील नाइलाज लपणारा नव्हता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याचेच संकेत त्यातून घेता यावेत.
मुळात, नाइलाज जसा सुप्रियातार्इंच्या शुभेच्छांमागे आहे, तसाच तो संबंधितांच्या पक्षांतरामागेदेखील आहे. पक्ष सोडून जाणारे शरद पवार यांना येऊन भेटून, बोलून जातात. कायद्याचा दुरूपयोग व तुरुंगाची भीती सर्वांनाच वाटते, असे सांगताना खुद्द सुळे यांनीच चौकशा टाळण्यासाठी तसेच अडचणीतील बॅँका व साखर कारखाने वाचविण्यासाठी पक्षांतरे होत असल्याची कारणमीमांसा केली आहे. तेव्हा, हा उभयपक्षी नाइलाजाचा मामला आहे हे खरेच; पण नेतेच जर असा प्रासंगिक मतलबासाठीचा दलबदलूपणा करणार असतील आणि त्यांना त्याकरिताची मोकळीक देत शुभेच्छाही दिल्या जाणार असतील तर सामान्य कार्यकर्त्यांनी तरी निष्ठेच्या सतरंज्या किती दिवस व का म्हणून उचलत राहायच्या, असा प्रश्न उपस्थित होणे टाळता येऊ नये. बरे, आजपर्यंत सत्तेचे अगर संधीचे म्हणून जे जे काही लाभ होते ते सर्व नेत्यांनाच दिले गेले, तरी ते कृतघ्नपणा करतात आणि प्रामाणिक-निष्ठावान कार्यकर्ता संधीच्या प्रतीक्षेत चपला घासत बसलेला दिसतो, ही स्थिती अशा पडझडीच्या वेळी तरी पक्षधुरीणांना काही शिकवून जाणार की नाही?
महत्त्वाचे म्हणजे, जाणाºयांना शुभेच्छा देतानाच त्यांच्या जाण्याने हलके झाल्यासारखे वाटते आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. या हलकेपणामागील ‘जडत्व’ खूप काही सांगून जाणारे आहे. पक्षापेक्षा स्वत:ची प्रतिमा मोठी करून स्वत:चे स्तोम माजवून ठेवणारे बडे नेते कोणत्याही राजकीय पक्षासाठी जड किंवा भाराचेच ठरत असतात. त्यात राष्टÑवादीसारखा पक्ष तर अशाच बाहुबली नेत्यांचा. त्यामुळे जाणा-यांचे ओझे दूर होतेय, अशी त्यांची भावना असणे स्वाभाविक ठरावे; पण खरेच तशी स्थिती असेल तर पक्षाने आजवर अशी ‘ओझी’ का शिरावर घेऊन मिरवली, असा प्रश्नही करता यावा. अर्थात, पुन्हा नाइलाज, असेच त्याचे उत्तर यावे. पण मग तोही नाइलाजच असेल तर आज तशांना नाइलाजाने शुभेच्छा देताना उदारतेचा भाव बाळगताच येऊ नये.
उल्लेखनीय बाब अशी की, नाशिकच्या स्थानिक संदर्भाने छगन भुजबळ यांच्याबाबत होत असलेल्या चर्चांवरून सुळे यांना प्रश्न विचारला गेल्यावर, एकीकडे राष्टवादीतील ‘ओझी’ दूर होत असल्याने हलके झाल्याची भावना व्यक्त झाली असताना, दुसरीकडे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नाशकातच बोलताना छगन भुजबळ रिपाइंत आल्यास आमचा पक्ष मजबूत होईल, असे विधान केले. परंतु भुजबळच काय, कुणीही नेते जे आपला पक्ष सोडून भाजप अगर शिवसेनेत जात आहेत किंवा जाऊ पाहत आहेत, ते सदर पक्ष मजबूत करायला नव्हे तर स्वत:चे बस्तान शाबूत राखायला तिकडे जात आहेत, हे लक्षात घ्यायला हवे. आठवलेंचा पक्ष तशाही स्थितीत मजबूत होऊ शकेल हा भाग वेगळा; पण म्हणून शिवसेना स्वीकारणार नसेल तर अगदी रिपाइं (आठवले)मध्ये जाण्याइतपत भुजबळसारख्यांचा नाइलाज असेल, असे मानता येऊ नये. तेव्हा, सुप्रियाताई असोत, की आठवले व चर्चांचे केंद्रिभूत भुजबळ, सा-यांची सारी वाटचाल नाइलाजाशी संबंधित असल्याचा अर्थ यातून काढला जाणे गैर ठरू नये.