हास्यविनोद मानसिक आजारावर उत्तम टॉनिक : श्यामसुंदर झळके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 06:18 PM2019-11-09T18:18:58+5:302019-11-09T18:19:28+5:30
आजच्या ताणतणाव व स्पर्धेच्या काळात हास्यविनोदाचा अंगीकार केला, तर मानसिक स्वास्थ्य लाभते. हास्य हे मानसिक आजारावरील उत्तम टॉनिक असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बहि:षाल शिक्षण मंडळाचे अधिव्याख्याते डॉ. श्यामसुंदर झळके यांनी केले. निफाड येथे श्री माणकेश्वर वाचनालय आयोजित संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना हास्यवटी-विनोदातून प्रबोधनाकडे या विषयावर ते बोलत होते.
सिन्नर : आजच्या ताणतणाव व स्पर्धेच्या काळात हास्यविनोदाचा अंगीकार केला, तर मानसिक स्वास्थ्य लाभते. हास्य हे मानसिक आजारावरील उत्तम टॉनिक असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बहि:षाल शिक्षण मंडळाचे अधिव्याख्याते डॉ. श्यामसुंदर झळके यांनी केले.
निफाड येथे श्री माणकेश्वर वाचनालय आयोजित संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना हास्यवटी-विनोदातून प्रबोधनाकडे या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा प्रतिमापूजनाने झाली.
यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष मधुकर शेलार, कार्यवाह बाळासाहेब कापसे, संचालक दत्ता उगावकर, राजेंद्र सोमवंशी, ग्रंथपाल बाळासाहेब खालकर, तन्वीर राजे, राजेंद्र खालकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. बाळासाहेब कापसे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय केला. तसेच ग्रंथभेट देऊन सत्कार केला.
डॉ. झळके यांनी आपल्या व्याख्यानात विनोदाचे महत्त्व विशद करताना दैनंदिन जीवनात आनंदाने व ताणतणाव रहित जगताना हास्यविनोद केल्याने जीवन सुसह्य होत असल्याचे सांगितले. आजकाल माणसाचा संवाद कमी होऊन त्याची जागा मोबाइल, संगणक, सोशल मीडियाने घेतली आहे. त्याच्या आहारी गेल्याने माणसातील माणूसपण हरवले असून, तो एकांगी व उदासीन झाला आहे. त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी विविध सामाजिक उपक्रम, नैसर्गिक सहली, मनमोकळ्या गप्पा, हास्यविनोदाने जीवन समृद्ध करावे, असा सल्ला दिला. विविध क्षेत्रांतील गमतीजमती, विनोदी किस्से सादर करून उपस्थिताना मनमुराद हसवले. तसेच विनोदातून प्रबोधन करताना अनेक प्रसंग सांगितले. यावेळी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.