सिडकोत लॉटरीच्या नावाखाली क्रिकेटवर बेटींग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 01:32 PM2018-02-03T13:32:38+5:302018-02-03T13:32:42+5:30
नाशिक: लॉटरीच्या नावाखाली सुरू असलेल्या भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका या वन डे क्रिकेट मॅचवरील बेटींगची माहिती मिळताच शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने सिडकोतील लेखानजर येथील राजश्री लॉटरी सेंटरवर गुरुवारी (दि़१) रात्रीच्या सुमारास छापा टाकला़ यामध्ये तीन संशयितांना ताब्यात घेऊन ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़
युनिट दोनचे सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे यांना राजश्री लॉटरी सेंटरमध्ये क्रिकेटवर बेटींग सुरू असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर, सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे पोलीस हवालदार रमेश घडवजे, पोलीस नाईक संजय ताजणे, देवकिसन गायकर, मोतीलाल महाजन, पोलीस शिपाई जयंत शिंदे यांनी छापा टाकला़ लॉटरी सेंटरचे मालक संशयित दत्तू पंढरीनाथ आव्हाड (३८, रा. गजानन चौक, अंबड), अनिल सुभाष कदम (२९, रा. शिवाजी चौक, सिडको) व हर्षल कारभारी सानप (२८, रा. खंडेराव चौक, शांतीनगर, सिडको) या तिघांना ताब्यात घेतले़ त्यांच्याकडून मोबाईल, एलसीडी, टीव्ही व रोख रक्कम ६६ हजार रुपयांचे जुगार खेळण्याचे साहित्य जप्त केले़
या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात तिघांविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़