सावधान...मदतीसाठी पुढे आलेला हात दुचाकीचोराचाही असू शकतो...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 12:59 PM2019-09-04T12:59:30+5:302019-09-04T13:08:04+5:30
नाशिक : मोपेड दुचाकी अचानकपणे एअर धरते अन् बंद पडते ही समस्या सर्वसामान्यपणे अधिक जाणवते अशावेळी महिलांची व ज्येष्ठांची ...
नाशिक : मोपेड दुचाकी अचानकपणे एअर धरते अन् बंद पडते ही समस्या सर्वसामान्यपणे अधिक जाणवते अशावेळी महिलांची व ज्येष्ठांची अधिक दमछाक होते.तसेच वाहनतळात उभी केलेली दुचाकी वाहनांच्या गराड्यातून बाहेर काढतानादेखील महिलांची अडचण निर्माण होते. याप्रसंगी महिलांना मदतीच्या बहाण्यासाठी काही पुरूष पुढे येतात. त्याचाच फायदा आता चोरटेदेखील घेत असून मदतीच्या बहाण्याने चक्क दुचाकी ताबा मिळवून भामटे फरार होत असल्याचे काही घटनांमुळे समोर आले आहे. त्यामुळे मदत घेताना सावधगिरी बाळगणे दुचाकीच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे झाले आहे.
शहर व परिसरात दुचाकीचोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेकदा पोलिसांकडून दुचाकी चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना बेड्याही ठोकल्या जातात व विविध गुन्हे उघडकीस आणले जातात; मात्र तरीही दुचाकी चोरीचे सत्र थांबलेले नाही. सण-उत्सवांच्या काळात अशा घटनांमध्ये अधिकच वाढ होत असते. त्यामुळे नागरिकांनी आपल्या वाहनांची सुरक्षेविषयी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. दोन दिवसांपुर्वी नवीन मध्यवर्ती बसस्थानकात काही कामानिमित्त आलेल्या प्रतीक्षा प्रवीणकुमारजी संचेती या युवतीने आपली अॅक्टिवा दुचाकी (एम.एच.१५ डीक्यू ०८८७) रस्त्यालगत असलेल्या वाहनतळात उभी केली. बसस्थानकातून चौकशी करून ही युवती बाहेर आली तेव्हा तिच्या दुचाकीभोवती अन्य वाहनांचा गराडा पडलेला होता. त्यामुळे दुचाकी काढणे तिला अशक्य झाले. तिच्या अडचणीचा फायदा वाहनतळात टेहळणी करत असलेल्या एका दुचाकीचोराने घेतला. मदतीच्या बहाण्याने तो भामटा पुढे आला आणि त्याने संचेती यांच्याकडून दुचाकीची किल्ली मागितली. दुचाकी वाहनांच्या गराड्यातून रस्त्यावर काढली आणि ‘स्टार्ट’ करून थेट पोबारा केला. क्षणार्धात डोळ्यांदेखत दुचाकी चोरी झाल्याचे बघून संचेती यांना धक्का बसला. त्यांनी तत्काळ घटनेची माहिती सरकारवाडा पोलिसांना कळविली.
चोरटा सीसीटीव्हीत कैद
घटनास्थळी पोलीस दाखल झाले. वाहनतळाशेजारी असलेल्या एका हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्या चोरटा एखाद्या सुशिक्षिताप्रमाणे पोशाख परिधान करून टेहळणी करत असल्याचे आढळले. संचेती यांनीही त्यास ओळखले. सीसीटीव्ही फूटेजच्या अधारे पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज गुन्हे शाखेलाही पुरविण्यात आले आहे. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्याचे हवालदार गुंजाळ पुढील तपासाला गती देत आहेत.