‘मॉर्निंग वॉक’साठी घराबाहेर पडाल तर खबरदार...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 08:06 PM2020-03-29T20:06:03+5:302020-03-29T20:12:22+5:30
शहरातील सर्व क्रीडांगणे, उद्याने, जॉगिंग ट्रॅक बंद करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी होणार नाही, यासाठी सर्व खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात आहे,
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायद्यासह कलम-१४४ लागू करण्यात आला आहे. यानुसार नागरिकांना आपत्कालीन व अत्यावश्यक कारणाव्यतिरिक्त बाहेर पडण्यास थेट जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केली असतानादेखील काही नागरिक दिवस उजाडताच ‘मॉर्निंग वॉक’च्या निमित्ताने घराबाहेर पडतात, अशा नागरिकांवर आता पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. गंगापूर पोलिसांनी रविवारी (दि.२९) निष्काळजीपणाने बाहेर भटकंती करणा-या १४ जॉगर्सविरुद्ध कारवाई केली.
कोरोना या जीवघेण्या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता मनपा, पोलीस व जिल्हा प्रशासनासह जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर झटत आहेत. साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी मागील काही दिवसांपासून केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून शहरातील सर्व क्रीडांगणे, उद्याने, जॉगिंग ट्रॅक बंद करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी होणार नाही, यासाठी सर्व खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात आहे, तरीदेखील काही नागरिक रिंगरोड व नदीकाठाच्या परिसरात सकाळी फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडत असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या लक्षात आले. त्यांच्या आदेशान्वये गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंचल मुदगल यांच्या पथकाने गोदापार्क भागात रविवारी जॉगर्सविरुद्ध कारवाई केली. यावेळी एकूण १४ नागरिकांवर कलम-१८८प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच नागरिकांचे प्रबोधनदेखील करण्यात आले. ‘आपले व इतरांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी कृपया घराचा उंबरा ओलांडू नका’ असे कळकळीचे आवाहन मुदगल यांनी यावेळी केले. दरम्यान, नांगरे- पाटील यांनी सर्वच पोलीस ठाण्यांना अशाप्रकारे कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या भागात सकाळी नागरिक फेरफटका मारताना दिसतील त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदविण्याचे आदेश त्यांनी पोलीस ठाणेप्रमुखांना दिले आहेत. सकाळी गस्तीवर असलेल्या विशेष पथकांना नागरिकांच्या जॉगिंगच्या ठिकाणांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
--
शतपावलीवरही करडी नजर
सकाळचा फेरफटका तसेच रात्रीची शतपावली करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी आता कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्याकरिता नागरिकांना काही दिवस आपल्या दिनचर्येत बदल करणे हा अनिवार्यच आहे. यामुळे नागरिकांनी गांभीर्य समजून घेत मॉर्निंग वॉक, शतपावलीकरिता बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.