रस्त्यावर वाद घालणारे, स्वत:हून लिफ्ट देणाऱ्यांपासून सावधान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:16 AM2021-09-23T04:16:42+5:302021-09-23T04:16:42+5:30
नाशिक : प्रवास करीत असताना रस्त्यावर विनाकारण वाद घालणाऱ्यांकडून, स्वत:हून लिफ्ट देणारांकडून अथवा पत्ता विचारणारांकडून लुटमारीच्या घटना घडत असल्याचे ...
नाशिक : प्रवास करीत असताना रस्त्यावर विनाकारण वाद घालणाऱ्यांकडून, स्वत:हून लिफ्ट देणारांकडून अथवा पत्ता विचारणारांकडून लुटमारीच्या घटना घडत असल्याचे प्रकार मागील काही दिवसांपासून समोर येऊ लागले आहेत. नागरिकांचे लक्ष एखाद्या गोष्टीकडे वळवून त्यांच्याकडील पैसे, दागिने अथवा मौल्यवान वस्तूंच्या चोरीसाठी चोरट्यांकडून वेगवेगळ्या क्लुप्त्या लढविल्या जात असून यात अनेकदा महिलांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून पळ काढण्याच्या घटना वाढल्या आहेत. चोरट्यांकडून प्रवाशांचे लक्ष विचलित करण्यासाठी अनेकदा रस्त्यावर वाद घातला जातो. गाडीचा धक्का लागला. गाडी आडवी मारली, अशी कारणे देऊन वाद घालतानाच त्यांच्या सहकाऱ्यांकडून प्रवाशांची लूट केली जाते. त्यामुळे नागरिकांनी चोरट्यांच्या अशा क्लुप्त्यांना बळी न पडता सावधानता बाळगणे गरजेचे बनले असून रस्त्यावर आपत्कालीन स्थितीत वादात न पडता तत्काळ नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधणे, पत्ता सांगताना अनोळखी व्यक्तीपासून दोन हात दूर राहणे, वाहनावर बसलेल्या व्यक्तीशी बोलणे टाळणे हेच अशा लुटीच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांच्या हिताचे ठरणारे आहे.
---
कन्नमवार पुलाखाली नेऊन होते लूट
मागील काही दिवसांपूर्वी नाशिक शहरात एका प्रवाशाला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने काही जणांनी दुचाकीवर बसवून कन्नमवार पुलाखाली नेत चाकूचा धाक दाखवून लूटमार केल्याची घटना घडली होती. परिसरातील टवाळखोरांकडून अशाप्रकारे प्रवाशांना इच्छितस्थळी सोडण्याचे सांगून रिक्षात बसवून अथवा दुचाकीवर बसवून कन्नमवार पुलाखाली नेत लूटमार करण्याचे प्रकार केले जात असल्याच्या घटना मागील काही दिवसांत घडल्या आहेत.
---
असे तुमच्याही बाबतीत घडू शकते
१) अनेकदा आपण रस्त्याने रात्री-अपरात्री जात असताना वाटेत कुठेतरी वाद झाल्याचे दिसते. रस्त्याच्या मधोमध घोळका करून लोक उभे राहतात. त्यामुळे प्रवासी नेमके काय झालेय हे पाहण्यासाठी थांबतात आणि इथेच मोठी चूक घडते.
२)रस्त्यात वाद घालणारे हे चोरट्यांचे टोळके असते. हे जेव्हा लक्षात येते तेव्हा प्रवाशांच्या पायाखालची वाळू सरकते. नाशिक शहर व परिसरात अशा प्रकारच्या घटना अलीकडच्या काळात समोर आल्या नसल्या तरी शहर व जिल्ह्याबाहेर जाताना नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक बनले आहे.
----
काय काळजी घ्याल...
प्रवासाला निघताना वाटेत निर्जनस्थळी कोठेही थांबू नये. काहीजण प्रवाशांना वाहन थांबवून खाली उतरण्यासाठी विनाकारण वाद घालत असल्याचे भासवत असतात. त्यामुळे अशा ठिकाणी वाहन थांबवू नये, अशा घटनेचे गांभीर्य ओळखून त्याविषयी पोलिसांना माहिती द्यावी. अशाप्रकारे काळजी घेतली तर आपली फसगत टाळून प्रवास सुखकर करणे निश्चितच शक्य असल्याचे पोलीस सांगतात.