कोयत्याने निघृण खून : भांडण सोडविण्यास गेला अन् प्राणाला मुकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 02:27 PM2019-01-28T14:27:21+5:302019-01-28T14:30:35+5:30
जेलरोड परिसरातील चंपानगरी भागातील एका उद्यानाजवळ सुरू असलेले भांडण मिटविण्यासाठी गेलेल्या रोहित प्रमोद वाघ याच्यावर टोळक्यामधील काही संशयितांनी कोयत्याने सपासप वार करुन निघृण खून केल्याची घटना घडली आहे.
नाशिक : शहराची कायदासुव्यवस्था धोक्यात आली असून दर पंधरवड्याला शहरात खूनासारखे गंभीर गुन्हे घडत असल्याने संताप व्यक्त होत आहे. राजरोसपणे टोळके शहरात सशस्त्र फिरत असल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. जेलरोड परिसरातील चंपानगरी भागातील एका उद्यानाजवळ सुरू असलेले भांडण मिटविण्यासाठी गेलेल्या रोहित प्रमोद वाघ याच्यावर टोळक्यामधील काही संशयितांनी कोयत्याने सपासप वार करुन निघृण खून केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात त्याचा मित्र रितेश विनायक पांडव व अल्केश राजू जॉन यांच्यावरही प्राणघातक हल्ला संशयितांनी केला असून ते गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चंपानगरी जेलरोड परिसरात रोहित हा अत्याबहीणीच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी रविवारी (दि.२८) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास आला होता. रोहित हा सुभाषरोडवरील रहिवासी आहे. यावेळी संशयित रोहित पारखे, करण केदारे, विशाल जाधव, सोनू गायकवाड, बाळा केदारे, ललीत वागळे, मयुर गायकवाड, सागर गांगुर्डे, समाधान आव्हाड, अमित वाघमारे, आशिष वाघमारे आदिंनी चंपानगरी उद्यानाच्या जवळ येत आपआपसांत भांडण सुरू केले. येथून जवळत रोहितच्या आत्याबहिणीच्या हळदीचा कार्यक्रम सुरू असल्यामुळे रोहित, रितेश, अल्केश हे तीघे त्यांना समजावण्यासाठी गेले. ‘येथे भांडण करु नका, हळदीचा कार्यक्रम आहे’ असे सांगितल्यानंतर संशयितांपैकी रोहित पारखे, करण केदारे यांनी या तीघा मीत्रांवर सशस्त्र हल्ला चढविला. कोयत्याने रोहितच्या छातीवर वर्मी घाव लागला तर रितेश, अल्केश यांनाही दुखापत झाली. हल्ल्यानंतर संशयितांनी तेथून पळ काढला. दरम्यान, या तीघांना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता मध्यरात्रीच्या सुमारास उपचारादरम्यान रोहित वाघ याला डॉक्टरांनी मयत घोषित केले. उर्वरित दोघा जखमींवर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच उपनगर, नाशिकरोड पोलीस ठाण्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले; मात्र तोपर्यंत सर्व संशयित फरार झाले होते. तत्काळ पोलिसांनी तपासचक्रे फिरवून अकरा संशयितांपैकी सहा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समजते. अविनाश विष्णू वाघ याने दिलेल्या फिर्यादीवरून संशयितांविरुध्द उपनगर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, गोरेवाडी भागात दंगल नियंत्रण पथकाला पोलिसांनी पाचारण केले आहे. या भागातील संशयित हल्लेखोर असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे पोलिसांनी गोरेवाडी परिसर पिंजून काढण्यास सुरूवात केली आहे. मयत वाघ हा सुभाषरोडवरील रहिवासी होता त्यामुळे परिसरातील व्यावसायिकांनी त्याच्या खूनाच्या घटनेनंतर व्यवसाय बंद ठेवला आहे.