भाजीबाजाराचे भिजत घोंगडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:36 AM2017-07-31T00:36:48+5:302017-07-31T00:36:58+5:30
पाथर्डी फाटा येथील मुरलीधरनगर रस्त्यावरील अत्यंत वादग्रस्त अनधिकृत भाजीबाजार स्थलांतराच्या समस्येचे भिजत घोंगडे अजून काही दिवस तसेच राहण्याची चिन्हे आहेत.
पाथर्डी फाटा : पाथर्डी फाटा येथील मुरलीधरनगर रस्त्यावरील अत्यंत वादग्रस्त अनधिकृत भाजीबाजार स्थलांतराच्या समस्येचे भिजत घोंगडे अजून काही दिवस तसेच राहण्याची चिन्हे आहेत. राजकीय दबावामुळे प्रशासनाला हा प्रश्न सोडविण्यापेक्षा तो तसाच प्रलंबित ठेवण्यात स्वारस्य वाटत असण्याची शक्यता नागरिक व्यक्त करीत असून, भाजीबाजार हलविण्याची मागणी करीत आहेत. प्रशासन एक जागा म्हणते, तर प्रभाग सभापती दुसºया जागेसाठी प्रयत्नात आहेत. पाथर्डी फाट्यावरील सर्व्हिस रस्त्यावर भरणारा भाजीबाजार अनेक तक्रारींनंतर मनपा प्रशासन पोलीस व महामार्ग प्राधिकरणाने तो तेथून हटविण्यात आला होता. या भाजीविक्रेत्यांनी येथून जवळच्याच पाथर्डी रस्त्याला लागून असलेल्या मुरलीधरनगरचा पूर्ण ताबा घेऊन अनधिकृतपणे व्यवसाय सुरू केले. काही राजकीय मंडळींचे या व्यावसायिकांशी असलेले संबंध त्यांना कायम संरक्षण देत आले आहे. परिसरातील नागरिकांनी अनेकवेळा तक्रारी करूनही मनपा प्रशासनाने भाजीबाजाराचा प्रश्न सोडविण्याकडे लक्ष पुरविले नाही. दरम्यान, शिवसेनेचे नगरसेवक सुदाम डेमसे यांनी एप्रिलअखेर येथे पाचारण करून साईबाबा मंदिरासमोरील मोकळ्या भूखंडावर बाजार स्थलांतरित करण्याचे सुचविले. कुमावत यांनीही जागा, जागेचा नकाशा व परिसरातील नागरिकांची तयारी बघून दीड महिन्यात प्रस्ताव मंजूर करून भाजीबाजार स्थलांतराचे ठोस आश्वासन दिले. दीड ऐवजी तीन महिने होऊनही कार्यवाही होत नसल्याने नागरिकांनी बाजार हटविण्याची मागणी केली आहे. याविषयी विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी सांगितले की पाहणीनंतर माहिती घेतली असता भाजीबाजारासाठी वासननगरमधील क्रीडाप्रबोधिनीला लागून रस्त्यापर्यंतच्या जागेवर आरक्षण कधीच टाकलेले असल्याने तेथे बाजार स्थलांतरित केला जाईल. सध्या फेरीवाला झोन निश्चितीचे काम सुरू असून, अन्य छोटे-मोठे बाजार स्थलांतरित केले जात आहेत. पाथर्डी फाटा येथील बाजाराचा विषय अजून हाती घेतलेला नाही, अशी माहिती त्यांनी दिली. शहरभर भाजीबाजारांचे प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न होत असताना पाथर्र्डी फाट्यावरील भाजीबाजाराचे स्थलांतराचा विषय जाणीवपूर्वक भिजत ठेवला जातो आहे? असा सवाल परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. कुमावत यांनी क्रीडाप्रबोधिनीजवळची जागा सांगत असताना नगरसेवक सुदाम डेमसे मात्र साईबाबा मंदिराच्या पुढे जाऊन रस्त्याच्या बाजूच्या जागेवर बाजार होणार असल्याचे सांगत आहेत. असे असले तरी या बाजाराला एक लोकप्रतिनिधींचा पाठिंबा असल्याने त्याचे स्थलांतर लांबणीवर पडत असल्याची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये आहे.