एटीएम कट्टा गँगकडून भरदिवसा युवकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 01:37 AM2019-02-09T01:37:17+5:302019-02-09T01:37:35+5:30
उपेंद्रनगरला लहान मुलांच्या भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून दोघा संशयितांनी भरदिवसा युवकाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना शुक्रवारी (दि़८) सायंकाळच्या सुमारास शुभम पार्कजवळ घडली़ वैभव ऊर्फ बबलू विजय गांडुळे (२३, रा. शुभमपार्क, उपेंद्रनगर, सिडको) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे़ याप्रकरणी संशयित शुभम पेंढारे व त्याच्या साथीदाराविरोधात अंबड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सिडको : उपेंद्रनगरला लहान मुलांच्या भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून दोघा संशयितांनी भरदिवसा युवकाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना शुक्रवारी (दि़८) सायंकाळच्या सुमारास शुभम पार्कजवळ घडली़ वैभव ऊर्फ बबलू विजय गांडुळे (२३, रा. शुभमपार्क, उपेंद्रनगर, सिडको) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे़ याप्रकरणी संशयित शुभम पेंढारे व त्याच्या साथीदाराविरोधात अंबड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, या घटनेमुळे सिडकोतील गुन्हेगारी व गुंडगिरीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़
अंबड पोलीस ठाण्यात निखिल रामदास सोनवणे (२५, रा़साई निवास, उपेंद्रनगर, सिडको) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील गणपती मंदिरात कार्यक्रम ठेवण्यात आले होते़ या कार्यक्रमाच्या ठिकाणी हॅलोजन लाइटची आवश्यकता असल्याने ते घेण्यासाठी निखिल सोनवणे व वैभव गांडुळे हे दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास हिरोहोंडा डिलक्स दुचाकीने (एमएच १५, डीएन ७४२९) ने शुभम पार्क येथील सुमंगल मंडप डेकोरेटर्स येथे जात होते़ रस्त्याने जात असताना वैभव याने दोन मुलांकडे बोट दाखवून सांगितले की, चौकातील लहान मुलांच्या भांडणात मध्यस्थी केल्यापासून शुभम पेंढारे व त्याचा साथीदार त्रास देत आहेत़ यानंतर या दोघांनी सुमंगल मंडपसमोर दुचाकी लावून हॅलोजन घेण्यासाठी जात असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेला पेंढारे व त्याचा साथीदार यांनी वैभवसोबत वाद घालून तुला लई माज आला आहे, असे म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली़ यानंतर पेंढारे याने कमरेच्या मागे लपविलेले तीक्ष्ण व धारदार हत्यार काढून ‘तुला लई खुजली होती ना भुगत आता’ असे म्हणून वैभवच्या छातीत खुपसले़ यावेळी निखिल सोनवणेमध्ये पडला असता त्यास धक्काबुक्की करून बाजूला केले़ तसेच तू बाजूला हो नाही तर तुलाही खपवून टाकू असे म्हणून दोघेही दुचाकीवरून माउली लॉन्सच्या दिशेने पळून गेले़
यानंतर घटनास्थळी पडून असलेल्या वैभव गांडुळे यास निखिल सोनवणे, स्वप्नील, प्रेमसिंग शिंदे यांनी प्रथम कल्पतरू हॉस्पिटल व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले़ या घटनेनंतर शुभम पार्क भागात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून धारदार हत्यार जप्त केले असून, दुकानातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासणी सुरू केली आहे़ मयत वैभव गांडुळे हा सम्राटग्रुपमध्ये कामाला होता़ त्याच्या पश्चात आई, वडील व भाऊ, असा परिवार आहे.