नि-हाळेकरांना भोजापूरच्या पाण्याची आस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 04:27 PM2018-09-04T16:27:26+5:302018-09-04T16:27:58+5:30
सिन्नर तालुक्याच्या पूर्वभागात अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने सर्व जलस्रोत कोरडे पडले आहेत. वाड्या-वस्त्यांवरील रहिवाशांसाठी व गुरे-वासरांना पिण्याच्या पाण्यासाठी पाझर तलावांत भोजापूरचे पूरपाणी सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे. लोकप्रतिनिधी व पाटबंधारे विभागाने दुष्काळी परिस्थितीचा विचार करुन नि-हाळे परिसरातील बंधारे भरण्यासाठी प्राधान्य देण्याची मागणी होत आहे.
परिसरात यंदा तिसऱ्या वर्षीही दुष्काळाचे सावट आहे. पावसाअभावी तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शेतपिकांना रिमझिम पावसाने जीवदान मिळाले आहे. मात्र वाड्या-वस्त्यांवरील ग्रामस्थांना व गुरे-वासरे यांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत असल्याने त्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरु झाली आहे. या भागातील सर्वच जलस्रोत कोरडे ठणठणीत असल्याने या बंधा-यांत भोजापूर धरणाचेपाणी पूरचा-यांद्वारे सोडून ते बंधारे भरुन द्यावेत, अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे. पश्चिम पट्ट्यात पाऊस झाल्याने भोजापूर धरण काही दिवसांपूर्वी शंभर टक्के भरले आहे. मात्र तालुक्याच्या पूर्वभागात तीन महिने संपून गेले तरी पाऊस झाला नसल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे. वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. नि-हाळे-फत्तेपूर येथे पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरच्या फे-या सुरु आहेत. परिसरातील बंधा-यांमध्ये भोजापूर धरणाच्या चारीद्वारे पाणी सोडल्यास ग्रामस्थांना दिलासा मिळेल व नागरिकांचा तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल.