विधानसभा निवडणुकीतही भगरे पॅटर्न?; नाशिकमध्ये प्रमुख उमेदवारांची धाकधूक वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 04:02 PM2024-10-31T16:02:01+5:302024-10-31T16:02:24+5:30

लोकसभा निवडणुकीतील पॅटर्न विधानसभा निवडणुकीतही दिसणार असून, काही मतदारसंघांमध्ये अधिकृत उमेदवाराच्या नावाचे उमेदवार उभे करण्यात आले आहेत.

Bhagare pattern in assembly elections too tension of major candidates increased in Nashik | विधानसभा निवडणुकीतही भगरे पॅटर्न?; नाशिकमध्ये प्रमुख उमेदवारांची धाकधूक वाढली

विधानसभा निवडणुकीतही भगरे पॅटर्न?; नाशिकमध्ये प्रमुख उमेदवारांची धाकधूक वाढली

Nashik Vidhan Sabha ( Marathi News ) :  पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या नामसाधर्म्याचा उमेदवारही निवडणुकीत असल्यानंतर काय होऊ शकते याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या दिंडोरी लोकसभा निवडणुकीत आला आहे. भास्कर भगरे या राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या नावाशी मिळतेजुळते नाव असलेल्या बाबू भगरे या एका अशिक्षित उमेदवाराने तब्बल लाखभर मते घेतल्याने अवघ्या महाराष्ट्रात या बाबू भगरेची चर्चा झाली. आता हाच पॅटर्न विधानसभा निवडणुकीतही दिसणार असून, काही मतदारसंघांमध्ये अधिकृत उमेदवाराच्या नावाचे उमेदवार उभे करण्यात आले आहेत.

नांदगाव या मतदारसंघात शिंदे गटाचे सुहास द्वारकानाथ कांदे हे उमेदवारी करीत आहेत. याच मतदारसंघातून सुहास बापूराव कांदे नावाचा अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहे. केवळ नामसाधर्म्यामुळे या उमेदवारास ता. कळंब जि. धाराशिव येथून आणून नांदगावात उभे करण्यात आल्याने या उमेदवाराची चर्चा होऊ लागली आहे. अर्थात प्रत्यक्ष अर्ज माघारीपर्यंत काय काय घडामोडी घडतात यावरून या डुप्लिकेट कांदेचा अर्ज अवलंबून असणार आहे. नांदगाव मतदारसंघातच उद्धव सेनेचे अधिकृत उमेदवार गणेश जगन्नाथ धात्रक यांच्या नावाशी मिळतेजुळते नाव असलेला दिंडोरी तालुक्यातील ढकांबे येथील गणेश काशिनाथ धात्रक असा दुसरा उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात आहे. त्यामुळे या एकाच मतदारसंघात दोन उमेदवारांच्या नावांचे दोन डमी अपक्ष असल्याने काही प्रमाणात त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

असाच काहीसा प्रकार कळवण-सुरगाणा मतदारसंघात देखील घडला आहे. कळवण सुरगाणा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नितीन अर्जुन पवार हे निवडणूक लढवत असताना त्यांच्या समोर कळवण तालुक्यातीलच साकोरा येथील नितीन उत्तम पवार नावाचा उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे. त्यामुळे कळवण- सुरगाणा या आदिवासी मतदारसंघात नामसाधर्म्याचा प्रभाव कितपत पडणार याचीच सध्या मतदारसंघात चर्चा सुरू आहे. दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुनीता रामदास चारोस्कर या निवडणूक लढवत आहेत तर अपक्ष म्हणून सुशीला शिवाजी चारोस्कर या देखील अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. सुनीता आणि सुशीला चारोस्कर असे साधर्म्य असल्याने येथे देखील काही प्रमाणात घोळ होऊ शकतो. मात्र सुशीला चारोस्कर यांना जाणीवपूर्वक उभे करण्यात आले असे नाही, तर त्या स्वतः निवडणुकीत उतरल्या आहेत. त्या दिंडोरी तालुक्यातीलच कसबेवणी येथील रहिवासी असून माजी जिल्हा परिषद सदस्या आहेत.
 

Web Title: Bhagare pattern in assembly elections too tension of major candidates increased in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.