बाबा रामदेवजी यांच्या ‘जम्मा जागरण’ सोहळ्यात भाविक दंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 12:56 AM2019-12-22T00:56:30+5:302019-12-22T00:56:48+5:30
‘पलके ही पलके बिछायेंगे’, ‘मोरिया अच्छो बोलो रे धोरा मायमें’, ‘खम्माँ, खम्माँ किर्तन की है रात’ आदि विविध राजस्थानी पारंपरिक भावगीते, भजन यासह श्री बाबा रामदेवजी यांच्या जन्मसोहळ्यापासून विवाह सोहळा व समाधीसोहळ्यापर्यंतच्या जीवन प्रवासाचे वर्णन हैदराबाद येथील संगीतकार व कथाकार सुशील बजाज यांनी कथा गायन करून नाशिककर भाविकांचे मन जिंकले.
नाशिक : ‘पलके ही पलके बिछायेंगे’, ‘मोरिया अच्छो बोलो रे धोरा मायमें’, ‘खम्माँ, खम्माँ किर्तन की है रात’ आदि विविध राजस्थानी पारंपरिक भावगीते, भजन यासह श्री बाबा रामदेवजी यांच्या जन्मसोहळ्यापासून विवाह सोहळा व समाधीसोहळ्यापर्यंतच्या जीवन प्रवासाचे वर्णन हैदराबाद येथील संगीतकार व कथाकार सुशील बजाज यांनी कथा गायन करून नाशिककर भाविकांचे मन जिंकले. या कथा गायन व नामस्मरण सोहळ्यातून राजस्थानी समाजाचे लोकदैवत श्री बाबा रामदेवजी यांना उपस्थितांना नमन केले.
नाशिक शहरातील श्री बाबा रामदेवजी भक्त परिवारातर्फे श्री बाबा रामदेवजींचा तिसरा विशाल जम्मा जागरण’ सोहळा शनिवारी (दि.२१) गंगापूररोडवरील श्रद्धा लॉन्स येथे उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी श्रीकृष्ण पारिख यांनी नऊ दाम्पत्यांकडून होमहवन व मुख्य पूजा करवून घेतली. यावेळी कळमसरा येथील बाबाजी श्री रामदेवजी शर्मा, नाशिक येथील माजिसा सरलाबाई लुणावत यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्य पूजनानंतर संगीतकार, कथाकार व भजन सम्राट सुशील बजाज यांनी सुमधुर आवाजात कथा गायन करताना श्री बाबा रामदेवजींच्या जन्मापासून ते समाधीपर्यंतचा जीवनप्रवास भजन, जन्म वृत्तांत, कथा ब्यावला यातून सादर करून भाविकांची मने जिंकली. दरम्यान, विशाल जम्मा जागरण सोहळ्यात अभिनेता चिन्मय उद््गीरकर व अभिनेत्री कल्पना भावसार, तसेच नाशिकमधील लोकप्रतिनिधी, तसेच शेकडो भाविक उपस्थित होते. उपस्थितांसाठी यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. जम्मा जागरण सोहळ्यात मराठी अभिनेता चिन्मय उदगीरकर व अभिनेत्री कल्पना भावसार यांनी उपस्थिती लावून भाविकांचे लक्ष वेधून घेतले. श्री बाबा रामदेवजी भक्तपरिवारातील निर्मला चोरडिया यांच्यासह संजय लोढा, प्रसाद गौड, स्वप्नील जैन, तन्मय जैन, पीयुष बोरा, उमेश जैन, हर्ष अग्रवाल, उमेश खिंवसरा, रूपाली गौड, तृप्ती जैन, आरती शर्मा, कविता शर्मा, पूनम बरिंडवाल, समता जैन, शीतल जैन यांनी समन्वयक म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडतानाच पुढील वर्षीही चौथ्या जम्मा जागरण सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन रामदेवजी भक्तपरिवारातर्फे करण्यात आले आहे. जम्मा जागरण सोहळ्यास नाशिकमधील लोकप्रतिनिधींसह भाविक उपस्थित होते.
तिसरे विशाल जम्मा जागरण
वेगवेगळ्या राजस्थानी समाजाचे लोकदेवता श्री बाबा रामदेवजी यांच्या साक्षात्कारांचे त्यांच्या भाविकांना कथा गायनातून दर्शन घडविण्याच्या उद्देशाने श्री बाबा रामदेवजी भक्तपरिवारातर्फे नाशिकमध्ये गेल्या तीन वर्षांपासून श्री बाबा रामदेवजींचा तिसरा विशाल जम्मा जागरण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या माध्यमातून बाबा रामदेवजी यांच्या कार्याची प्रचार व प्रसिद्धी करून त्यांनी विश्वशांतीसाठी दिलेला समता एकात्मतेचा संदेश समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सोहळ्याच्या व्यावस्थापक रूपाली गौड यांनी सांगितले.