लष्कराच्या संरक्षक भिंतीमुळे भगूर-नानेगाव रस्ता बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 01:46 AM2019-05-14T01:46:06+5:302019-05-14T01:46:52+5:30
लष्कराच्या विजयनगर येथील संरक्षक भिंतीमुळे स्वातंत्र्यपूर्व काळापासून वाहतूक सुरू असलेला भगूर-नानेगाव रस्ता बंद करण्याच्या भूमिकेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.
देवळाली कॅम्प : लष्कराच्या विजयनगर येथील संरक्षक भिंतीमुळे स्वातंत्र्यपूर्व काळापासून वाहतूक सुरू असलेला भगूर-नानेगाव रस्ता बंद करण्याच्या भूमिकेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.
लष्कराच्या संरक्षिक भिंतीमुळे रस्ता बंद होण्यामुळे विद्यार्थी, कामगार वर्गासह शेतमाल वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होणार असून, नानेगाव ग्रामस्थांना शेतमाल देवळाली कॅम्प-भगूरला आणण्यासाठी शिंदे-पळसे नाहीतर दोनवाडे-राहुरी मार्गे लांबचा प्रवास करून जावे लागणार आहे. महाराष्टÑ शासनाकडून गावागावांना जोडणारे शिवरस्ते जोडण्याची उपाययोजना असताना स्वातंत्र्यपूर्व काळापूर्वीपासून रस्ताच बंद करण्याच्या भूमिकेमुळे ग्रामस्थांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भगूर-नानेगाव रस्ता बंद करण्याच्या लष्कराच्या भूमिकेविरुद्ध लष्करी अधिकाऱ्यांसह जिल्हा प्रशासनाला याबाबत निवेदन दिले होते. त्यानंतर या रस्त्याबाबत कोणताही निर्णय होऊ शकला नव्हता. स्थानिक पातळीवर कॅन्टोन्मेंट प्रशासनाच्या माध्यमातून लष्कर व ग्रामस्थ यांच्या प्रश्नांवर तोडगा काढत लष्करी हद्द व रेल्वे यादरम्यान पंधरा-वीस फुटांचा रस्ता कॅन्टोन्मेंट बोर्डाने करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र सहा महिन्यांनंतर रस्त्याचे आश्वासन सर्वच अधिकारी विसरल्याने त्या रस्त्याच्या जागेवर संरक्षक भिंतीचे काम सुरू झाले आहे.
भगूर-नानेगांव रस्ता बंदबाबत नानेगाव ग्रामस्थांनी रविवारी ग्रामस्थांची बैठक घेऊन रस्त्याच्या मुद्द्याबाबत लष्करी अधिकाºयांची भेट घेण्याचे नियोजित केले आहे.
पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचे बाधीत होणाºया नानेगावाला आता भगूरहून होणाºया वाहतुकीचा रस्ताच लष्करी प्रशासनामुळे बंद होणार आणि ‘इंग्रज बरे की अच्छे दिन चांगले’ अशी मनस्तापाची वेळ नानेगाव ग्रामस्थांवर येऊन ठेपली आहे.
वाहतूक इतरत्र मार्गस्थ करावी लागणार
भगूरहून शिंदे-पळसेला जाणारा नानेगाव मार्गे रस्ता या लष्कराच्या संरक्षक भिंतीमुळे बंद होणार असून, भविष्यकाळात भगूर-इगतपुरीकडून शिंदे, पळसे, एकलहरा आदी गावांकडे जाणारा रस्ताच बंद होणार असल्यामुळे वाहतुकीची मोठी गर्दी नाशिकरोड मार्गे मार्गस्थ करावी लागणार आहे. ग्रामीण भागात भगूरहून नानेगाव, शिंदे, पळसे या गावांना जोडणारा मार्ग बंद झाला तर सध्या बंद असलेल्या नाशिक साखर कारखान्यालाही ऊस वाहतुकीसाठी मोठा फटका बसणार आहे.